औषध दुकानदारांची शहरातून रॅली; रुग्णांच्या सुविधेसाठी ‘लाईफ लाईन’, ‘निकोप’ आणि ‘व्होरा’ हॉस्पिटलमधील मेडिकल सुरू.
। लोकजागर । फलटण । २० मे २०२६ ।
‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य पूर्ण ताकदीने सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे फलटण शहर आणि संपूर्ण तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने आज (बुधवार) कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. औषध विक्रेत्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून या लाक्षणिक आंदोलनाला १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत ऑनलाईन औषध विक्री पूर्णपणे बंद करा, कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे औषधांवर दिला जाणारा अव्यवसायिक डिस्काऊंट थांबवा आणि बनावट औषधांच्या धोक्यापासून देश वाचवा, या प्रमुख मागण्यांसाठी हा एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळण्यात आला आहे. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी फलटण शहरातील यशवंतराव चव्हाण फार्मसी कॉलेज येथून सर्व मेडिकल व्यावसायिकांनी एकत्र येत रॅली काढली. ही रॅली शहराच्या मुख्य मार्गावरून घोषणाबाजी करत अधिकार गृह (प्रशासकीय इमारत) येथे पोहोचली. तेथे असोसिएशनच्या वतीने प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले. रॅलीदरम्यान “केमिस्ट असोसिएशनच्या एकतेचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
दरम्यान, या देशव्यापी बंदमुळे स्थानिक पातळीवर रुग्णांना किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्रास होऊ नये, याची विशेष काळजी असोसिएशनने घेतली आहे. तालुक्यातील अत्यावश्यक आणि अतितातडीच्या औषध पुरवठ्यासाठी फलटण शहरातील ‘लाईफ लाईन हॉस्पिटल’, ‘निकोप हॉस्पिटल’ आणि ‘व्होरा बेबी केअर हॉस्पिटल’ या तीन ठिकाणची मेडिकल दुकाने आज दिवसभर सुरू ठेवण्यात आली होती, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या नियोजित सुविधेमुळे गंभीर रुग्णांची गैरसोय टळली असली, तरी इतर सर्व औषध दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत वैद्यकीय क्षेत्रात शुकशुकाट पाहायला मिळाला. केंद्र सरकारने या मागण्यांवर तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा केमिस्ट बांधवांनी दिला आहे.
