नाशिकच्या शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा बहुमान; ग्रामीण व कृषी संस्कृतीचा अमूल्य वारसा शब्दबद्ध करणाऱ्या साहित्यकृतीचा गौरव.
। लोकजागर । फलटण । २९ मे २०२६ ।
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव जलाल येथील ‘शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती ५ व्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कारांचे निकाल नुकतेच घोषित करण्यात आले आहेत. या मानाच्या पुरस्कारांमध्ये ललितलेख संग्रह या साहित्य प्रकारासाठी फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ या बहुचर्चित ग्रंथास संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी अधिकृत पत्राद्वारे ही अभिमानास्पद माहिती दिली असून, या यशामुळे फलटणच्या सांस्कृतिक व शैक्षणिक वर्तुळातून प्रा. शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२५ या वर्षासाठी आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित लेखकांकडून विविध साहित्यप्रकारांतील एकूण १८६ साहित्यकृती प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये १०३ कविता संग्रह, ४१ कथा संग्रह, २२ कादंबऱ्या आणि २० ललित लेखसंग्रहांचा समावेश होता. या सर्व कलाकृतींमधून ललित प्रकारात प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या ग्रंथाने अव्वल स्थान पटकावले, तर याच प्रकारात अमरावतीच्या अरुणा सबाने यांच्या ‘उमेद जगण्याची’ या पुस्तकाला उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. या ललित संग्रहाचे परीक्षण कोपरगावचे प्रा. राम गायकवाड यांनी केले. सर्व विजेत्या साहित्यिकांचा गौरव येत्या ४ जून २०२६ रोजी पिंपळगाव जलाल (जि. नाशिक) येथे होणाऱ्या एका भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात केला जाणार आहे.
विस्मृतीत जाणारा जिवंत वारसा ठरतोय पसंतीला: प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ या ग्रंथाला यापूर्वी ‘शिविम साहित्य पुरस्कार’ व ‘छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार’ हे दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. आता मिळालेला हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. या ग्रंथाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना, तर प्रसिद्ध व्याख्याते डॉ. यशवंत पाटणे यांची मोलाची पाठराखण लाभली आहे. आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगात ग्रामीण व कृषी संस्कृतीतील नामशेष होत चाललेले नांगर, मोट, पोहरा, कावड, जाते, काठवट, कणगी, कंदील, गोधडी आणि आगळ यांसारखे एकूण १८ पारंपारिक घटक केवळ वस्तू नसून, आपल्या संस्कृतीचा अमूल्य व जिवंत वारसा आहेत; हे लेखकाने आपल्या ललित रम्य आणि ओघवत्या भाषेत प्रभावीपणे मांडले आहे. म्हणूनच हा ग्रंथ सध्या वाचक, समीक्षक आणि परीक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
इतर विभागांतील पुरस्कार विजेते: या राज्यस्तरीय स्पर्धेत कविता संग्रहासाठी प्रतिभा सुरेश खैरनार (नांदगाव, नाशिक – ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’) यांना प्रथम, तर अरविंद भामरे (धुळे) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. कथा संग्रहात सयाजी शिंदे (राहुरी – ‘चरैवेति’) यांना प्रथम, तर संध्या धर्माधिकारी (सोलापूर – ‘बेरं’) यांना उत्तेजनार्थ बहुमान मिळाला. कादंबरी क्षेत्रात राजेश चौरे (कडेगाव, सांगली – ‘जिद्द पेरतांना’) यांनी प्रथम, तर अशोक पवार (पारनेर – ‘…आणि रामा कलेक्टर झाला’) यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावला आहे.
फलटणमधून उमटल्या आनंदाच्या लाटा: प्रा. डॉ. अशोक शिंदे यांना हा अत्यंत मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम आणि सर्व सहकारी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
