कै. ॲड. धोंडीराम खरात यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त सामाजिक उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा संदेश.
। लोकजागर । फलटण । २६ मे २०२६ ।
फलटण तालुक्यातील ताथवडे येथील वन विभागाच्या क्षेत्रात ‘डसऱ्याक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डराडो – DURADO) या एनजीओच्या वतीने एका विशेष वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त प्राचार्य कै. ॲड. धोंडीराम अर्जुना खरात सर यांच्या ७६ व्या जयंती आणि ६ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हा स्तुत्य सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत वन विभागाच्या हद्दीत शेकडो वृक्षांचे रोपण आणि बीज रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा एक उत्तम संदेश देण्यात आला.
हा कार्यक्रम ‘डराडो’ संस्थेचे डायरेक्टर ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात आणि डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली पार पडला. याप्रसंगी वन विभागाचे वनरक्षक सुरज इंकर आणि वनसेवक गजाबा जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे ताथवडे परिसरातील वनक्षेत्राच्या हरितकरणाला मोठी मदत होणार आहे.
वृक्षारोपण यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सक्रिय वॉलंटियर्स राजाराम अडसूळ, सुखदेव फुले, पंकज शिंदे, सनी नाळे, श्रीकांत गावडे, अशोक गावडे, वीरसेन सोनवणे आणि हिम्मतराव खरात यांच्यासह ताथवडे गावचे ग्रामस्थ, जाधव व शिंदे कुटुंबीय आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या सर्व रोपांचे आणि बीजांचे भविष्यात व्यवस्थित जतन व संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आला.
