लायन्स क्लब व माळजाई मंदिर समितीचा स्तुत्य उपक्रम.
। लोकजागर वृत्त । फलटण । १३ ऑक्टोबर २०२६ ।
लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त १३ ऑक्टोबर रोजी माळजाई देवी मंदिरात फलटण शहरातील ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. पत्रकारितेच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमातून पत्रकार बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविणे, शासनाच्या विविध योजना व निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच नागरी प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी पत्रकारिता पार पाडत असते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्याय, समस्या आणि जनहिताच्या विषयांना प्रसिद्धी देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यामध्ये पत्रकारांचे योगदान मोलाचे ठरत असून त्यांच्या लेखणीमुळे अनेक प्रश्न समाजासमोर येतात व सकारात्मक बदलांना चालना मिळते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, युवराज पवार, विकास शिंदे, सुधीर अहीवळे, राजाभाऊ बोंद्रे, सागर चव्हाण, योगेश गंगतीरे, गणेश भोईटे आणि शेखर गायकवाड यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
माळजाई देवीच्या नवरात्रोत्सवाला धार्मिक श्रद्धेची जोड देतानाच सामाजिक सलोखा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानाची परंपरा जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. यावेळी माळजाई मंदिर व उद्यान समितीचे चेअरमन प्रमोद निंबाळकर, खजिनदार महेश गरवालीया तसेच लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचे सचिव चंद्रकांत कदम उपस्थित होते. सामाजिक ऐक्याची भावना वृद्धिंगत करणे आणि समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या घटकांचा गौरव करणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
