सातारा येथे २९ सप्टेंबर रोजी भव्य ‘महाकुंभ रोजगार मेळावा’; हजारो तरुणांना मिळणार थेट नोकरीची संधी

जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग घेण्याचे आवाहन; नामांकित कंपन्या आणि इंडस्ट्री असोसिएशनचा असणार मोठा सहभाग.

। लोकजागर वृत्त । सातारा । १६ सप्टेंबर २०२६ ।

जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यात भव्य महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयातील धनाजी बागल यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजना गणेशोत्सव कालावधीत थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शिंदे-देशमुख इन्स्टिट्यूट सातारा येथे लोकसंवाद-२०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण, इन्स्टिट्यूटचे संस्थापक चंद्रशेखर शिंदे, मच्छिंद्र निकम यांच्यासह इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना बागल म्हणाले की, या महाकुंभ रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित उद्योजक, विविध इंडस्ट्री असोसिएशन आणि विविध क्षेत्रांतील कंपन्या मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या माध्यमातून दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय आणि डिप्लोमाधारक तरुण-तरुणींना थेट मुलाखती देऊन रोजगाराच्या व प्रशिक्षणाच्या संधी मिळवता येणार आहेत. उद्योजक आणि इंडस्ट्री असोसिएशनच्या सहभागामुळे स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार असून औद्योगिक क्षेत्राची गरज आणि तरुणांचे कौशल्य यांचा योग्य मेळ या मेळाव्याच्या माध्यमातून घातला जाणार आहे. याशिवाय विविध महाविद्यालयांतील अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या मेळाव्याच्या निमित्ताने कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव आणि भविष्यातील संधींबद्दल मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह आणि बायोडाटासह २९ सप्टेंबर रोजी या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे. या सुवर्णसंधीचा जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, सातारा येथे भेट द्यावी किंवा कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही बागल यांनी स्पष्ट केले.

Spread the love