ठेवी १२१ कोटी तर कर्ज वाटप ९१ कोटींवर; सभासदांचा विश्वास आणि पारदर्शक कारभारामुळे संस्थेचा आलेख उंचावला.
। लोकजागर । फलटण । ३० मे २०२६ ।
महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि फलटणमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या ‘महाराजा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ने आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०१० मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेच्या आजमितीस सातारा, पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांत एकूण आठ शाखा अत्यंत यशस्वीपणे कार्यरत आहेत. संस्थेची नुकत्याच संपलेल्या सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात तब्बल ९३३ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल झाली असल्याची अधिकृत माहिती संस्थेचे चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी दिली. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. संदीप जगताप, सर्व शाखाप्रमुख आणि सेवक वर्ग यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीची आकडेवारी मांडताना सांगितले की, सध्या संस्थेकडे १५० कोटी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध आहे. संस्थेच्या एकूण ठेवी १२१ कोटी रुपये असून, ९१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. याशिवाय संस्थेची विविध सुरक्षित क्षेत्रांत ३८ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. या सर्व आर्थिक व्यवहारांमधून संस्थेला चालू आर्थिक वर्षात एकूण २ कोटी ३४ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, चोख कर्ज वसुली आणि कायदेशीर व्यवस्थापनामुळे संस्थेला सन २०२५ अखेर सलग १२ वर्षे शासकीय लेखापरीक्षणात (ऑडिट) ‘अ’ वर्ग मिळालेला आहे.
सामाजिक बांधिलकी आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार: याप्रसंगी माहिती देताना संस्थेचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले म्हणाले की, महाराजा मल्टी स्टेट केवळ बँकिंग क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही नेहमी अग्रेसर राहिली आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी मोफत नेत्र तपासणी शिबिर, भव्य आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर यांसह विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. संस्थेच्या या उत्कृष्ट सहकार आणि सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून, संस्थेला आजवर सलग तीन वेळा मानाचा ‘नॅशनल अवॉर्ड’ (राष्ट्रीय पुरस्कार) मिळालेला आहे.
सभासदांचा व ठेवीदारांचा अखंड विश्वास, खर्चातील काटकसर आणि प्रशासकीय कारभारातील पारदर्शकता या त्रिसूत्रीमुळेच संस्थेचा यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे, असा विश्वासही व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी यावेळी व्यक्त केला. महाराजा मल्टी स्टेटच्या या नेत्रदीपक आर्थिक प्रगतीबद्दल फलटणसह सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातून संस्थेचे मोठे कौतुक केले जात आहे.
