पीडब्ल्यूडी निवासस्थानाची भिंत पाडून रस्ता मोठा करा; नंदकुमार मोरे यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

नगरपरिषदेच्या पालखी मार्गावरील अतिक्रमण हटाव व रस्ता रुंदीकरण मोहिमेचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून कौतुक.

। लोकजागर । फलटण । ४ जून २०२६ ।

आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, फलटण नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या हद्दीतील पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवून सुरू असलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम अत्यंत कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे. या मोहिमेमुळे पालखी मार्गाला मोठा मोकळा श्वास मिळाला असून, याच धर्तीवर श्रीमंत मालोजीराजे पुतळ्याजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) पडीक निवासस्थानाची संरक्षक भिंत पाडून हा रस्ता अधिक रुंद करण्यात यावा, अशी मागणी फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार संभाजी मोरे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकृत निवेदनात नंदकुमार मोरे यांनी नमूद केले आहे की, फलटण शहरातील श्रीमंत मालोजीराजे पुतळा परिसराजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान आहे. सध्या या निवासस्थानाचा वापर फारसा होत नाही, या निवासस्थानाची संरक्षक भिंत पाडल्यास हा रस्ता मोठ्या प्रमाणावर रुंद होऊ शकतो.

पालखी मार्गाच्या सुशोभीकरणासाठी ‘आपले फलटण… सुंदर फलटण – मी फलटणकर’ ही भावना जपत प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Spread the love