अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन.
। लोकजागर वृत्त । फलटण । ६ जुलै २०२६ ।
फलटण तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या ‘श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. फलटण’च्या सद्य परिस्थिती संदर्भात सखोल व सविस्तर चर्चा करण्यासाठी आज, सोमवार दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी (फलटण) येथे एका विशेष आणि अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे स्वतः भूषवणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याच्या पुढील धोरणात्मक वाटचालीवर आणि सभासदांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा संदर्भ असा की, श्रीराम सहकारी साखर कारखान्यासोबत असलेला भागीदारी करार जवाहर कारखान्याने मुदतीपूर्वीच अचानक रद्द केला आहे. त्यामुळे श्रीरामच्या व्यवस्थापकीय मंडळाने तातडीने विशेष सभा बोलावून नामांकित ‘दत्त इंडिया’ कंपनीसोबत भागीदारी करार करण्याचा आणि इथून पुढे त्यांच्या मार्फत कारखाना चालवण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, या दत्त इंडिया कंपनी सोबतच्या नवीन कराराला स्थगिती आल्यामुळे कारखान्याचा आगामी गाळप हंगाम वेळेत सुरू होणार की नाही, असा मोठा निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीवर आणि कोंडीवर तोडगा काढण्यासाठीच आजची ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याशी संबंधित हा विषय सर्वसामान्य शेतकरी आणि तालुक्याच्या अर्थकारणाशी थेट निगडित असल्याने आजच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निर्माण झालेल्या अभूतपूर्व कायदेशीर पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीस कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, तालुक्यातील विविध सहकारी व सामाजिक संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कारखान्याचे हितचिंतक आणि सर्व सक्रिय कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन नितीन भोसले आणि कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे.
