फलटणमधील डेक्कन चौक ते उमाजीराजे नाईक चौक रस्त्याला आता ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ नाव; नगर परिषदेचा ऐतिहासिक निर्णय

। लोकजागर वृत्त । फलटण । ४ जुलै २०२६ ।

फलटण शहराची समृद्ध आध्यात्मिक परंपरा जपण्यासाठी आणि महान संत प.पू. गोविंदकाका महाराज उपळेकर यांच्या पवित्र व अलौकिक कार्‍याचे स्मरण पुढील पिढीला निरंतर राहावे, यासाठी फलटण नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रसिद्ध डेक्कन चौक ते उमाजीराजे नाईक चौक या मुख्य रस्त्याला आता ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ असे अधिकृत नाव देण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याला संत उपळेकर महाराजांचे नाव देण्यात यावे, या संदर्भात विजय उपळेकर यांनी नगरपरिषदेकडे रीतसर अर्ज केला होता. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत या अर्जावर सखोल विचारविनिमय करण्यात आला आणि सभागृहातील सर्व सदस्यांनी या नामांतराच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली.

संत प.पू. गोविंदकाका महाराज उपळेकर यांनी फलटणच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रात अतिशय मोलाचे व मार्गदर्शक योगदान दिले आहे. ते पेशाने डॉक्टर (वैद्यकीय व्यावसायिक) असतानाही त्यांना उच्च कोटीची दैवी आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होती. आपल्या या अलौकिक शक्तीच्या आणि वैद्यकीय ज्ञानाच्या बळावर त्यांनी आयुष्यभर दीनदुबळ्यांची सेवा केली आणि हजारो भक्तांचे कल्याण करून त्यांना सन्मार्ग दाखवला. त्यांच्या या महान आणि त्यागमयी कार्‍याची उचित दखल घेत फलटण पालिकेने हा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक नामांतराबाबत कृतज्ञतापूर्वक प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण नगरीला संतांचा आणि थोर पुरुषांचा खूप मोठा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संत उपळेकर महाराजांचे दिव्य कार्य पुढच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारे ठरेल, तसेच शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या पवित्र उद्देशाने हा रस्ता आता त्यांच्या नावाने ओळखला जाईल. नगर परिषदेने घेतलेला हा निर्णय शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वाटचालीतील एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी स्पष्ट केले.

Spread the love