ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम; विविध संस्थांना औषध पुरवठा

। लोकजागर वृत्त । फलटण । २० जुलै २०२६ ।

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण शहरात आगमन झाल्यानंतर वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान, फलटण यांच्या वतीने विविध सेवाभावी संस्था आणि वैद्यकीय केंद्रांना आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आला. या सामाजिक उपक्रमाचा उद्घाटन सोहळा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे यांच्या पत्नी पूजा देखणे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी फलटण येथील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ अवधूत गुळवणी, प्रसाद जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मिलिंद नेवसे आणि प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक – केंद्र फलटण, समर्थ प्रतिष्ठान फलटण, राजे उमाजी नाईक तालीम गणेश उत्सव मंडळ फलटण, युवा सेवक प्रतिष्ठान फलटण, लायन्स क्लब फलटण तसेच लोकमान्य हॉस्पिटल फलटण या संस्थांना विविध प्रकारची आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आली. या पुरवलेल्या औषधसाठ्याच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांना मोफत व तात्काळ वैद्यकीय उपचाराचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत सेवा, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे विशेष कौतुक करत, वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. समाजसेवेची परंपरा जपत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानने उचललेले हे पाऊल सामाजिक उत्तरदायित्वाचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

Spread the love