मराठा साम्राज्याच्या उभारणीत गंगोबातात्या चंद्रचूड यांचे सिंहाचे योगदान : पांडुरंग बलकवडे

फलटणचे इतिहास अभ्यासक पोपटराव बर्गे लिखित चरित्राचे भारत इतिहास संशोधक मंडळात प्रकाशन

। लोकजागर वृत्त । फलटण । ५ ऑगस्ट २०२६ ।

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचे पुढे साम्राज्यात रूपांतर होण्यामध्ये गंगोबातात्या यशवंत चंद्रचूड यांचा सिंहाचा वाटा होता. देशाच्या इतिहासावर जवळपास पन्नास वर्षे प्रभाव टाकणाऱ्या थोर मुत्सद्द्यांमध्ये त्यांची गणना होते. ज्ञान, शौर्य, मुत्सद्देगिरी आणि रणांगणावरील पराक्रम यांचा अद्वितीय संगम असलेले गंगोबातात्या हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक, तज्ज्ञ वक्ते आणि लेखक पांडुरंग बलकवडे यांनी केले.

फलटण येथील इतिहास अभ्यासक राहुल उर्फ पोपटराव बर्गे लिखित ‘मराठा साम्राज्याचे मानकरी राजश्री गंगोबातात्या यशवंत चंद्रचूड’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या म. म. द. वा. पोतदार सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील बल्लाळ चंद्रचूड होते. व्यासपीठावर पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीषभाऊ देशपांडे, अॅड. शरद चंद्रचूड, डॉ. माधुरी दाणी, चरित्र लेखक पोपटराव बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इतिहासातील अजरामर व्यक्तिमत्त्व

पांडुरंग बलकवडे म्हणाले, भारत इतिहास संशोधक मंडळ गेल्या शंभर वर्षांपासून चंद्रचूड घराण्याची हजारो ऐतिहासिक कागदपत्रे जिवापाड जतन करत आहे. गंगोबातात्यांविषयी इतिहासातील शेकडो पाने अभ्यासल्यानंतर त्यांच्या कार्याची व्याप्ती अधिक प्रकर्षाने जाणवते. ते केवळ मुत्सद्दी नव्हते, तर हाती तलवार घेऊन रणांगण गाजवणारे पराक्रमी योद्धेही होते.

ते पुढे म्हणाले, प्रत्येक समस्येवर युद्ध हा पर्याय नसतो; योग्य वेळी मुत्सद्देगिरी अधिक महत्त्वाची असते, याची जाणीव गंगोबातात्यांना होती. मराठ्यांनी लाहोर जिंकलेल्या मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. गंगापार अफगाणी पठाणांचा झालेला पराभव आणि त्या मोहिमेतील गंगोबातात्यांचे योगदान इतके उल्लेखनीय होते की, त्याबद्दल नानासाहेब पेशव्यांनी त्यांना विशेष पत्र पाठवून गौरव केला होता.

संपूर्ण पेशवाईचे साक्षीदार

गंगोबातात्या हे बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे आणि सवाई माधवराव पेशवे अशा संपूर्ण पेशवाईचे साक्षीदार होते. पेशवाईतील वैभव, संघर्ष, राजकीय चढ-उतार आणि साम्राज्य विस्तार या सर्व घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शिवकाळात बारामावळातील मावळ्यांनी साम्राज्य उभे केले, तर पुढील काळात खेड, शिरूर, दौंड आणि पुरंदर परिसरातील कर्तबगार व्यक्तींनी साम्राज्यविस्तारात योगदान दिले. बाजीराव पेशव्यांनी घोडदळाच्या गनिमी युद्धतंत्राला नवे स्वरूप दिले, तर चंद्रचूड घराण्याला ज्ञान आणि कर्तृत्वाचा समृद्ध वारसा लाभला असल्याचेही बलकवडे यांनी नमूद केले.

लेखकाने जपला घराण्याचा ऐतिहासिक ठेवा

अध्यक्षीय भाषणात बल्लाळ चंद्रचूड म्हणाले, “सुमारे अडीचशे वर्षांनंतर आमच्या पूर्वजांचा इतिहास इतक्या विस्ताराने जाणून घेण्याची संधी या चरित्रग्रंथामुळे मिळाली. लेखक पोपटराव बर्गे यांनी अथक परिश्रम घेत विविध ठिकाणी जाऊन ऐतिहासिक दाखले गोळा केले. निमगाव येथील आमचा वाडा प्रत्यक्ष पाहिला, भारत इतिहास संशोधक मंडळातील कागदपत्रे आणि अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला. या पुस्तकाच्या रूपाने आमच्या घराण्याचा अमूल्य ठेवा त्यांनी पुढील पिढ्यांसाठी जतन केला आहे.”

यावेळी त्यांनी चंद्रचूड परिवाराच्या वतीने भविष्यात गंगोबातात्यांची पुण्यतिथी निमगाव येथील वाड्यात साजरी करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच ऐतिहासिक दस्तऐवजांच्या जतनासाठी भारत इतिहास संशोधक मंडळाला २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.

अनामवीरांचा इतिहास पुढे यायलाच हवा

शिरीषभाऊ देशपांडे म्हणाले, “स्वराज्य टिकवण्यासाठी असंख्य अनामवीरांनी आपल्या छातीवर घाव झेलले. त्यांचा इतिहास नव्या पिढीसमोर येणे अत्यंत आवश्यक आहे. गंगोबातात्यांच्या चरित्रात त्यांच्या मुत्सद्देगिरीचे, न्यायनिवाड्याचे आणि समाजहिताच्या कार्याचे अनेक उल्लेख आढळतात. त्यांची परंपरा आजही चंद्रचूड परिवारातील अनेक सदस्य विविध क्षेत्रांत पुढे नेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.”

पानिपतच्या आठवणींना उजाळा

मानाजी पायगुडे यांचे वंशज अरुण पायगुडे यांनी पुस्तकाचे स्वागत करताना लेखक पोपटराव बर्गे यांच्यासमवेत केलेल्या पानिपत भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. पानिपत सभा मंडळाच्या स्थापनेपासून इतिहास संवर्धनाच्या विविध उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.

तीन आघाड्यांवर सोनेरी ठसा

डॉ. माधुरी दाणी म्हणाल्या, “चार पेशव्यांच्या काळात गंगोबातात्यांनी राजकारण, समाजकारण आणि रणांगण या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याचबरोबर त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्याही समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या चरित्रलेखनाची इच्छा माझ्या मनात होती; मात्र त्यासाठी लागणारा अभ्यास आणि विषयाची व्याप्ती लक्षात घेता ते काम मी हाती घेतले नाही. मात्र गंगोबातात्यांनी जणू स्वतःच लेखक पोपटराव बर्गे यांच्या लेखणीत प्रवेश करून हे चरित्र घडवून आणले. अन्नपूर्णाबाई साहेबांच्या शौर्यपूर्ण कार्याचाही इतिहासात महत्त्वाचा वाटा आहे.”

बहुआयामी व्यक्तिमत्त्व

इतिहास अभ्यासक मनोज दाणी यांनी गंगोबातात्या हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. मराठ्यांच्या उत्तर भारतातील साम्राज्य विस्तारात त्यांचे योगदान अत्यंत मोठे असून त्यांच्या संपूर्ण आयुष्याची भूमिका ही संस्थापक आणि संघटक अशीच राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

१४ महिन्यांच्या अभ्यासातून चरित्र साकार

लेखक पोपटराव बर्गे यांनी मनोगतात सांगितले की, “हा माझ्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचा क्षण आहे. गेल्या १४ महिन्यांपासून या चरित्रलेखनाचे काम सुरू होते. डॉ. माधुरी दाणी यांच्या प्रेरणेतून या संशोधनाची सुरुवात झाली. सुभेदार मल्हारराव होळकर यांची सावली म्हणून गंगोबातात्या अनेक मोहिमांमध्ये कार्यरत होते. इंदूर, ग्वाल्हेर तसेच उत्तर भारतातील अनेक ऐतिहासिक संदर्भांमधून त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित होते. विविध कागदपत्रे, संदर्भग्रंथ आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे हे चरित्र सिद्ध करता आले. या कार्यासाठी डॉ. माधुरी दाणी आणि विलास दाणी यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले.”

चरित्रामुळे इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल

सामाजिक कार्यकर्त्या माधुरी निंबाळकर यांनी गंगोबातात्यांविषयी यापूर्वी अल्प माहिती होती; मात्र या चरित्रामुळे त्यांचे संपूर्ण कार्य समाजासमोर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच चरित्रलेखनाच्या प्रवासात लेखकाला त्यांच्या पत्नी सौ. वर्षा बर्गे यांची मोलाची साथ लाभल्याबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेघना दाणी यांनी केले, तर आभार अॅड. शरद चंद्रचूड यांनी मानले.

या कार्यक्रमास प्रियाताई बेंद्रे, समाजसेविका सौ. निनाताई खानविलकर, डॉ. उषाताई देसाई, मोडी लिपी व इतिहास अभ्यासक पांडुरंग सुतार, राजा शिवछत्रपती युवक संघाचे अध्यक्ष सचिन भगत यांच्यासह चंद्रचूड परिवारातील सदस्य आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love