१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी; सहभागी साहित्यिकांना पुण्याच्या ऐतिहासिक संमेलनासाठी विशेष ‘बॅच’ मिळण्याची सुवर्णसंधी.
। लोकजागर वृत्त । फलटण । १६ सप्टेंबर २०२६ ।
जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात संपन्न होणाऱ्या ऐतिहासिक १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी आणि राज्यभरात साहित्यिक वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘नांदी संमेलनांची’ मालिका सुरू आहे. याच उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणच्या वतीने मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी फलटण शहरात भव्य ‘नांदी संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या नियोजनासाठी फलटण शहर व तालुक्यातील साहित्यिक, लेखक, कवी आणि व्याख्यात्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात ही पूर्वतयारी बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ असणार आहेत. या प्रसंगी सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या सातारा जिल्हा प्रतिनिधी अलका बेडकिहाळ फलटणच्या साहित्यिकांना संमेलन नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
पुण्यातील मुख्य १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी म्हणून समर्थ युवा फाऊंडेशनचे प्रमुख राजेश पांडे व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र आणि परदेशात मिळून एकूण ९९ नांदी संमेलने घेतली जात आहेत. मराठी भाषा आणि वाचनसंस्कृतीचा जागर तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. फलटण येथे होणारे संमेलन हे याच शृंखलेतील एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून, याद्वारे फलटणच्या समृद्ध साहित्यिक परंपरेला नव्याने उजाळा मिळणार आहे.
या नांदी संमेलनाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये सक्रिय सहभागी आणि सहकारी होणाऱ्या स्थानिक साहित्यिकांना पुण्याच्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी एका विशेष ‘बॅच’चे वितरण केले जाणार आहे. फलटणच्या साहित्यिकांना ऐतिहासिक शंभराव्या संमेलनाशी थेट जोडणारी ही एक अत्यंत सुवर्णसंधी ठरणार आहे. त्यामुळे फलटण शहर आणि तालुक्यातील सर्व लेखक, कवी, व्याख्याते, साहित्यप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी बुधवार, १६ सप्टेंबर रोजी जांभेकर विद्यालयात होणाऱ्या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे व कार्यवाह अमर शेंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
