मुधोजी हायस्कूलच्या १०० विद्यार्थ्यांनी तयार केल्या शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा केला संकल्प!

मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यशाळा संपन्न; कलाशिक्षक बापूराव सूर्यवंशी आणि मूर्तिकार राजेश बोथेकर यांचे मार्गदर्शन.

। लोकजागर वृत्त । फलटण । ११ सप्टेंबर २०२६ ।

गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा या उद्देशाने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत प्रशालेतील १०० विद्यार्थ्यांनी स्वतः शाडूच्या मातीपासून सुबक गणेशमूर्ती तयार करून, आगामी गणेशोत्सवात याच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास प्रसिद्ध मूर्तिकार राजेश बोथेकर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर व पर्यवेक्षक विजय पाटील उपस्थित होते. गेल्या सहा वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करणारे कलाशिक्षक बापूराव सूर्यवंशी आणि मूर्तिकार राजेश बोथेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या उपक्रमाबद्दल मूर्तिकार राजेश बोथेकर यांनी शाळेचे कौतुक केले.

या वेळी बोलताना मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर लहानपणापासूनच पर्यावरण संवर्धनाचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांसोबतच पर्यावरणाविषयी सामाजिक जाणीव निर्माण होत आहे. पर्यवेक्षक विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शाडू मातीच्या वापरामुळे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार असून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या मूर्तींमुळे समाजात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा एक उत्तम संदेश जाईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक बापूराव सूर्यवंशी व चेतन बोबडे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर यांनी मानले.

Spread the love