हिंगणगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळेतर्फे गुरुपौर्णिमा निमित्त मातृ-पितृ वंदना व पाद्यपूजन सोहळा
। लोकजागर वृत्त । फलटण । ५ ऑगस्ट २०२६ ।
शिक्षणाबरोबर मुलांना विचारांचे ज्ञान देणे ही काळाची गरज आहे. हे ज्ञान मुलांना देण्यासाठी पालकांनी पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे. आपली मुले सुसंस्कृत कशी होतील यावर पालकांनी विशेष भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्राचार्य रवींद्र येवले यांनी केले. मुले घडत असताना पालकांनी मुलांसोबत कसे राहिले पाहिजे आणि मुलांनी पालकांकडून काय आदर्श घ्यावा, यासंदर्भात ज्वलंत उदाहरणे देऊन त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांना गुरुपरंपरेचे महत्त्व स्पष्ट केले. सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा या प्रकल्पाच्या वतीने सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित मातृ-पितृ वंदना व पाद्यपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा फलटण तालुका प्रकल्प प्रमुख पोपटराव बर्गे, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर दाणी, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा कार्यवाह अमर शेंडे, प्रशांत धनवडे, सुषमाताई काटे, रेवतीताई गोसावी, जि.प.शाळा हिंगणगावचे मुख्याध्यापक, जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासाहेब भोईटे व सर्व समिती सदस्य आदींसह मान्यवर उपस्थित होते. गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने व परिचयाने करण्यात आली. या प्रसंगी अमर शेंडे यांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे औचित्य साधून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर उपस्थित पालक व शिक्षक वृंद यांचे पाद्यपूजन विद्यार्थ्यांनी केले. विद्यालयाचे शिक्षक ज. तु. गार्डे यांनी हा कार्यक्रम शाळेत घेतल्याबद्दल सेवा भारती या संस्थेचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रकल्प समिती सदस्य ५, हितचिंतक ३, शिक्षक ५, शिक्षिका ३, पालक ६३ आणि विद्यार्थी १५५ असे एकूण २३४ जण उपस्थित होते.
