सद्गुरू हरिबुवा महाराज पतसंस्थेच्या ३८ व्या वार्षिक सभेला विद्यार्थ्यांची उपस्थिती; दिलीपसिंह भोसले यांच्याकडून विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौतुक.
। लोकजागर वृत्त । फलटण । १६ सप्टेंबर २०२६ ।
इयत्ता बारावी सहकार विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित फलटणच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रत्यक्ष भेट दिली. उपक्रमशील शिक्षक सतीश जंगम यांनी विद्यार्थ्यांना सभेतील कामकाजाचे नियोजन, प्रत्यक्ष कामकाज आणि सभेतील प्रस्ताव व मंजूर होणारे ठराव याबाबतचे कामकाज कसे चालते, याविषयीचा प्रत्यक्ष अनुभव देऊन सविस्तर माहिती दिली.
सभेनंतर सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्रामध्ये आपले करिअर निर्माण करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी गेले अनेक वर्षे या संस्थेच्या सभेला उपस्थित राहून सभेचा प्रत्यक्ष अनुभव घेतात, याबद्दल भोसले यांनी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सतीश जंगम यांच्या प्रयोगशील अध्यापनाबद्दल विशेष अभिनंदन केले.
यावेळी सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, व्हाईस चेअरमन राजाराम फणसे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
