उळुंब जि. प. शाळेत वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप; विद्यार्थ्यांमध्ये दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

‘मैत्री संस्था’ व ‘प्रियदर्शनी विधी महाविद्यालया’चा संयुक्त उपक्रम; उपस्थितांचा झाडे लावून संगोपनाचा संकल्प.

। लोकजागर वृत्त । फलटण । २३ ऑगस्ट २०२६ ।

मैत्री बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण आणि प्रियदर्शनी ज्ञानप्रबोधिनीचे विधी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट २०२६) उळूंब (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण, शालेय साहित्य व खाऊ वाटप उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास मैत्री सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मंगेश सावंत, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अमित मोरे, सरपंच संपत (भाऊ) कळंबे, अशोक कळंबे, फरांदवाडीचे केंद्रप्रमुख शेखर चांगण, मुख्याध्यापक राजेंद्र अहिवळे, सहशिक्षिका गौरी जमदाडे, म. सा. प. शाखा कार्यवाह अमर शेंडे, विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या वेळी मनोगत व्यक्त करताना रवींद्र बेडकीहाळ यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण ही सर्वात प्रभावी पद्धत असल्याचे सांगितले. विधी महाविद्यालयाचे अमित मोरे यांनी पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज असून यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांनी अधिक योगदान दिले पाहिजे, असे आवाहन केले. इतर मान्यवरांनी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे, तसेच अशा प्रकारचे वृक्षारोपणाचे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मैत्री संस्थेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन संपतभाऊ कळंबे यांनी केले. आभार जि. प. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अहिवळे यांनी मानले.

Spread the love