। लोकजागर वृत्त । फलटण । २४ ऑगस्ट २०२६ ।
१ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या ‘चलो मुंबई’ ओबीसी संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी फलटण शहरासह तालुक्याचा दौरा करत विविध समाजघटकांशी सदिच्छा भेट व विचारविनिमय केला. या दौऱ्यादरम्यान आयोजित बैठकांमध्ये १ सप्टेंबर रोजी पाटस टोलनाका येथे एकत्र येत मोठ्या संख्येने मुंबईकडे निघण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दौऱ्यादरम्यान लक्ष्मण हाके यांनी फलटण शहरातील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग अहिवळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी उपस्थित आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत भेट देत १ सप्टेंबर रोजी पाटस टोलनाका येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
तसेच शहरातील गिरवी नाका येथे बाळासाहेब कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विविध सामाजिक प्रश्नांवर व संघर्ष यात्रेबाबत चर्चा केली. या वेळी, “लढा लढत असताना आंबेडकरी चळवळ सदैव सोबत आहे,” असा विश्वास व्यक्त करत बाळासाहेब कांबळे यांनी या संघर्षाला पाठिंबा दर्शवला.
फलटण शहर व तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या सहभागातून संघर्ष यात्रेच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह, फलटण येथे बैठक पार पडली. फलटण शहर, तालुका व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आंदोलनासाठी पाटस टोलनाका येथे एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
त्याचप्रमाणे धुळदेव (ता. फलटण) येथे ओबीसी प्रवर्गातील मायक्रो घटक असलेल्या घडशी समाजाची बैठक पार पडली. या वेळी महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या घडशी समाजाच्या प्रतिनिधींनी १ सप्टेंबरच्या ‘चलो मुंबई’ ओबीसी संघर्ष यात्रेत पारंपरिक वाद्ये आणि पारंपरिक पोशाखासह मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
