विद्रोही सांस्कृतिक चळवळ व संयोजन समितीतर्फे पारदर्शकता; वर्ष संपण्याआधीच हिशोब लोकांसाठी सादर.
। लोकजागर वृत्त । फलटण । १८ ऑगस्ट २०२६ ।
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र व १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने साताऱ्यात ९ व १० मे रोजी संपन्न झालेल्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा अधिकृत जमा-खर्च बैठकीत जाहीर करण्यात आला आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य भारत पाटणकर आणि संघटनेचे अध्यक्ष धनाजी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे पार पडलेल्या बैठकीत खजिनदार राहुल गंगावणे यांनी हा जमा-खर्च सादर केला. संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी प्रास्ताविक करून निधी देणाऱ्या सर्वांचे आभार मानले व सक्रिय कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. साताऱ्यातील या संमेलनासाठी विद्यार्थी, कार्यकर्ते, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवकांसह समाजातील सर्वच स्तरांतून निधी मिळाला होता.
जमा-खर्चाचा तपशील:
- एकूण रोख जमा निधी: ₹ १६,८४,९३८/-
- एकूण खर्च: ₹ १६,०५,२६४/-
- शिल्लक रक्कम: ₹ ७९,६७४/-
प्रबोधन मिरवणूक, उद्घाटन, ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ आणि ‘शिवराज्याभिषेक’ अर्थात किरण माने शो ही दोन नाटके, कवी संमेलन, माहितीपटाचे सादरीकरण, लोककला व शाहिरी, तसेच विविध विषयांवरील परिसंवादांनी हे संमेलन रंगले होते. मंडप उभारणी, जेवण, प्रवास भाडे आणि पाहुण्यांची निवास व्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात आली होती. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रथेप्रमाणे वर्ष संपण्याच्या आतच हा जमा-खर्च लोकांसाठी सादर करण्यात आल्याचे संयोजन समितीने स्पष्ट केले.
या बैठकीला संयोजन समितीचे सेक्रेटरी राजेंद्र गलांडे, सहकार्याध्यक्ष मिनाज सय्यद, प्रशांत पन्हाळकर, गौतम काटकर, प्रदीप मोरे, हणमंत सावंत, दिलीप भोसले, शिवाजी भोसले, शुभम ढाले, संकेत माने, अमित कांबळे, अस्तिका आगासे, हरी पाटील आणि संतोष गोठल उपस्थित होते.
