जिंतीतील श्री जितोबा विद्यालयास रोटरी क्लबकडून संगणक भेट; आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम संपन्न

२०० हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; प्लास्टिक निर्मूलनाची शपथ देऊन वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण.

। लोकजागर वृत्त । फलटण । २८ ऑगस्ट २०२६ ।

रोटरी क्लब ऑफ फलटण तालुका यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालय, जिंती (ता. फलटण, जि. सातारा) या विद्यालयास संगणक संच भेट देण्यात आला. या प्रसंगी वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, वैज्ञानिक जाणीव जागृती व प्लास्टिक निर्मूलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ फलटणचे संस्थापक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास महेश बर्वे, राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे, महादेव रणवरे, नवनाथ रणवरे, चंद्रकांत रणवरे, शरदराव रणवरे, विनायकराव रणवरे, शरदसर रणवरे, जगदेवराव रणवरे, माधुरी जाधव आणि ताराचंद्र आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बदलत्या काळानुसार एआय शिक्षणाची गरज ओळखून विद्यालयास हा संगणक संच सुपूर्द करण्यात आला.

आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये विद्यालयातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरासाठी अंकिता गांधी व सई खराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्लास्टिक निर्मूलन जनजागृती कार्यक्रमादरम्यान रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश बर्वे यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक निर्मूलन, पर्यावरण संवर्धन व प्लास्टिकचा वापर टाळण्याचे महत्त्व सांगून उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना प्लास्टिक निर्मूलनाची शपथ दिली.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लबचे सचिव सुधीर इंगळे यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग प्रत्यक्ष करून दाखविले, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक विचारसरणीचे महत्त्व पटवून दिले. या सर्व उपक्रमांमधून आरोग्याबाबत जागरूकता, पर्यावरण संवर्धन आणि अंधश्रद्धेविरोधात विवेकपूर्ण विचारसरणी निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले, सूत्रसंचालन अंकुश सोळंकी यांनी केले तर आभार अमोल जाधव यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ रणवरे, प्रणव रणवरे, रणजित रणवरे, विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, जिंती गावातील ग्रामस्थ, रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love