श्रीराम बझारची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
। लोकजागर वृत्त । फलटण । २८ ऑगस्ट २०२६ ।
दूरदृष्टी आणि धाडसाने हणमंतराव पवार यांनी मार्च १९८६ रोजी श्रीराम बझारची स्थापना केली. स्थापनेमागील त्यांच्या उद्देशाची परिपूर्ती करण्याचे काम गेली ४१ वर्षे संचालक मंडळ व अधिकारी वर्ग करत आहे. सर्वांच्या समन्वयाने श्रीराम बझार आज विक्रीचे नवनवीन चढते आलेख नोंदवत आहे. सभासदांची साथ, कामगारांचे योगदान, संचालक मंडळाने घेतलेले योग्य निर्णय आणि ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात श्रीराम बझार या संस्थेने ९१ कोटी ९ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. सर्वांच्या योगदानामुळे आज श्रीराम बझार प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन श्रीराम बझारचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक महादेवराव पवार यांनी केले. श्रीराम बझारच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीराम बझारचे विद्यमान चेअरमन जितेंद्र पवार होते.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते हणमंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गेल्या वर्षभरातील दिवंगत थोर नेते, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शास्त्रज्ञ व इतर क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभेच्या मुख्य कामकाजास सुरुवात झाली. या प्रसंगी व्यासपीठावर सदगुरू हरीबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, श्रीराम सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन व बझारचे संचालक नितीन भोसले, हणमंतराव पवार यांच्या सुकन्या तथा बझारच्या संचालिका पल्लवी पवार, माधवी पवार, श्रीराम बझारचे ज्येष्ठ संचालक मारुती गावडे, ज्येष्ठ संचालक व पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, तुषार गांधी, सदगुरू हरीबुवा महाराज संस्थेचे चेअरमन तथा बझारचे संचालक तेजसिंह भोसले, बापूराव गावडे, आनंदाव शिंदे, राजाराम फणसे, आनंदाव बेलदार, शीतल अहिवळे, चंद्रकांत शिंदे, सुभाष कर्ण, जयकुमार शिंदे, महादेवराव पोकळे, अनिल रणवरे, बिपीन गरुड, तसेच श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक परशुराम तावरे यांची उपस्थिती होती.
वार्षिक सभेस उपस्थित सभासदांचे स्वागत करताना संस्था चेअरमन जितेंद्र पवार यांनी बझारच्या कामकाजाचा आढावा घेतला. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे संस्थेच्या विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत असून संस्था ग्राहक, सभासद व कामगारांसाठी विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. सन २०२५-२०२६ मध्ये संस्थेस १ कोटी ६२ लाख रुपये नफा झाला आहे. सहकाराच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बझारचे कामकाज सुरू असून फलटण येथील मुख्य कार्यालयासह १२ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी संचालक व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
बझारचे व्हाईस चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी आपल्या मनोगतात सहकाराचे निकष समोर ठेवून संस्थेच्या जागा मंजुरीबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये मांडल्याचे सांगत, श्रीराम कारखान्याकडून योग्य किमतीत संस्थेस जागा मिळावी अशी सूचना केली; ज्यास सर्व सभासदांनी हात वर करून अनुमोदन दिले. हणमंतराव पवार यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बझारची भरभराट झाल्याची कबुली त्यांनी दिली. माजी चेअरमन महादेवराव पवार यांनी हणमंतराव पवार यांनी घालून दिलेल्या उद्दिष्टांनुसार कामकाज चालल्याचे सांगत, जीएसटीचे बदलणारे नियम व वाढत्या स्पर्धेतही श्रीराम बझारने गुणवत्ता व रास्त दराची परंपरा जपल्याचे नमूद केले.
श्रीराम बझारचे जनरल मॅनेजर अनंत पाटील यांनी वार्षिक सभेच्या नोटीसचे वाचन केले. विषय क्र. १ ते ११ वर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन ते संमत करण्यात आले. सभेसाठी सदगुरू हरीबुवा महाराज पतसंस्थेचे सरव्यवस्थापक संदीप जगताप, बझारचे परचेस ऑफिसर रवींद्र शिंदे, चीफ अकौंटंट अमोल बनसोडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सभेच्या शेवटी ज्येष्ठ संचालक मारुती गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानून सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले.
