‘जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका’ सिद्धाली शहा यांचा राजू शेट्टी यांच्या हस्ते विशेष सन्मान

‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मधील जागतिक विक्रमाबद्दल अभिनंदन; शहा परिवाराने नवा आदर्श निर्माण केल्याचे प्रतिपादन.

। लोकजागर वृत्त । फलटण । ३० ऑगस्ट २०२६ ।

जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने नोंद घेत गौरव केल्याबद्दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी फलटण नगरपरिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांचा नुकताच यथोचित सन्मान करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सिद्धाली शहा यांच्या या जागतिक विक्रमाचे आणि अद्वितीय कामगिरीचे कौतुक करताना राजू शेट्टी यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले.

या वेळी बोलताना ते म्हणाले की, फलटणसारख्या निमशहरी भागातून मुली राजकारणात पाऊल टाकत आहेत आणि नेतृत्व करत आहेत, ही खरोखरच फार मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आमचे जुने मित्र आणि अनुप शहा यांनी त्यांच्या कन्येला राजकारणात सक्रिय करून समाजात एक नवा आणि सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या उल्लेखनीय जागतिक विक्रमाबद्दल राजू शेट्टी यांनी सिद्धाली शहा यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. या सत्कार प्रसंगी फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

Spread the love