सातारा विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त एस. एस. मांजरेकर यांचे आवाहन; ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आणि नियम जाहीर.
। लोकजागर वृत्त । सातारा । २९ ऑगस्ट २०२६ ।
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ४१ (क) नुसार धार्मिक व सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी अथवा देणगी जमा करावयाची असल्यास सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व देणगीदारांनी विहित मार्गाने परवानगीसाठी www.charity.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन सातारा विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त एस. एस. मांजरेकर यांनी केले आहे.
परवानगीशिवाय सार्वजनिक उपक्रमासाठी निधी जमा करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. असे आढळल्यास कायद्याचे कलम ६६ व ६७ नुसार फौजदारी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. संस्था नोंदणी अधिनियम, १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अन्वये नोंद असलेल्या व ज्यांच्या उद्देशामध्ये गणेशोत्सव साजरा करणे असा उल्लेख असणाऱ्या संस्थांना अशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेच तात्पुरत्या स्वरूपातील परवानगीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नवीन परवानगीसाठी अर्ज करतेवेळी त्या त्या क्षेत्रातील नगरसेवक किंवा ग्रामपंचायतीचे तेथे गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती असल्याचे संमती पत्रक सादर करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव परवानगीचे आवश्यक अर्ज व आवश्यक माहिती पीडीएफ स्वरूपात कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सन २०२६ मधील तात्पुरत्या स्वरूपातील परवानगी देण्याचे काम १ ते १४ सप्टेंबर या कालावधीत कार्यालयात सुरू करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित लोकांनी सहायक धर्मादाय आयुक्त, सातारा राजधानी टॉवर्स, तिसरा मजला, यादोगोपाळ पेठ, सातारा येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. देणगीदारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगीची प्रत पाहून खात्री करून मगच देणगी अथवा वर्गणीबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त सातारा विभाग यांनी केले आहे.
