पंढरपूर ते घुमाण सायकल वारीत सहभागी व्हा; भागवत धर्म प्रसारक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांचे आवाहन

संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त २५०० किलोमीटरची भव्य रथयात्रा व सायकल वारी; ३० सप्टेंबरपूर्वी नाव नोंदणी करण्याचे आवाहन.

। लोकजागर वृत्त । पंढरपूर । १६ सप्टेंबर २०२६ ।

संत शिरोमणी नामदेव महाराज जयंतीनिमित्त क्षेत्र पंढरपूर ते क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे २५०० किलोमीटर रथयात्रा व सायकल वारीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भागवत धर्म प्रसारक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी केले आहे. भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव दरबार कमेटी घुमाण व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी अशी सुमारे एक महिन्याची संत शिरोमणी नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी काढण्यात येते. वारीचे हे पाचवे वर्ष आहे.

यंदा २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२६ दरम्यान या रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश अशा आठ राज्यातील सुमारे ५० मोठ्या शहरांतून व ५०० पेक्षा अधिक ग्रामीण भागातून ही अध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व निसर्गरम्य परिसराचे दर्शन घडविणारी सायकल वारी जाणार आहे. या सायकल वारीच्या माध्यमातून शांती, समता आणि बंधुता या संत विचारांचा प्रचार व प्रसार केला जाणार असून पर्यावरणाचा संदेशही दिला जाणार आहे.

या सायकल वारीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. सहभागी सायकल यात्रींना दोन टी-शर्ट, दररोज चहा, नाश्ता, भोजन व निवासाची मोफत व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. इच्छुक भाविकांनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपूर्वी भागवत धर्म प्रसारक मंडळ, सुमित्रा प्लाझा, वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सुर्यकांत भिसे यांनी केले आहे.

Spread the love