विजय जाधव यांचा ‘औषध सेवा रत्न’ सन्मानाने गौरव

केमिस्ट बांधवांच्या संघर्षमय व सेवाभावी प्रवाहाला मिळाला मानाचा मुजरा.

। लोकजागर वृत्त । फलटण । १६ ऑक्टोबर २०२६ ।

फलटण येथे ४१ वर्षे गौरवशाली औषध सेवा देणारे ‘विजय मेडिकल’चे विजय जाधव यांना त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल ‘औषध सेवा रत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले. हा अत्यंत प्रेरणादायी सन्मान महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशनचे वेस्ट झोन सदस्य राहुल मोहिते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. “औषधं हेच सेवा” हे ब्रीद जपत गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ रुग्णसेवा, औषध विक्री व वितरण क्षेत्रात अविरत, प्रामाणिक व सेवाभावी वृत्तीने कार्य करून ग्राहकांचा दृढ विश्वास संपादन केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला आहे.

या गौरवाबद्दल भावना व्यक्त करताना राहुल मोहिते यांनी सांगितले की, वास्तविक पाहता, २५ ते ३० वर्षांपूर्वी व्यवसाय करताना अनेक केमिस्टना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्या काळी आजच्यासारखी औषधांची डोअर डिलिव्हरी उपलब्ध नव्हती, त्यामुळे अनेक केमिस्टना सातारा, अकलूज आणि पुणे येथे स्वतः जावे लागे आणि वेळप्रसंगी आपली दुकाने बंद ठेवावी लागत असत. व्यवसाय आणि ग्राहकांप्रति अपुलकी व सेवाभाव मनात बाळगून सुनील मेडिकल, सचिन मेडिकल, महावीर मेडिकल यांसह बहुतांशी सर्वच मेडिकल चालकांनी रात्री-अपरात्री उठून औषधे दिली आणि पेशंटच्या औषधांशिवाय कधीही हेळसांड होऊ दिली नाही. आज जेव्हा त्यांचा सन्मान करण्यात आला, तेव्हा मागील २५ ते ३० ते ४० वर्षांचा खडतर इतिहास त्यांच्या डोळ्याखालून गेला. अनेकांना तर आपल्या दुकानाला इतकी वर्षे झाली आणि आपण एवढी मोठी रुग्णसेवा केली यावर विश्वासच बसत नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण कृतज्ञता दिसत होती आणि काही जण भावनिकही झाले होते.

बघता बघता आयुष्यातील मोठा काळ लोटला असून प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे होते. त्यांना सन्मानचिन्ह देताना उपस्थितांनाही खूप आनंद झाला, कारण त्यांचे कार्य एवढे मोठे आहे की त्याची तुलना कोणत्याही एका सन्मानचिन्हाशी होऊ शकत नाही. वेळप्रसंगी पै-पाहुण्यांच्या सुख-दुःखात जाता आले नाही, फॅमिली कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावता आली नाही, कुटुंबासोबत फॅमिली ट्रिप करता आल्या नाहीत आणि आपल्या आवडत्या छंदास वेळ देता आला नाही, या सर्व गोष्टींच्या त्यागानंतर मिळालेल्या समाधानामुळे अनेकांच्या एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू होते, परंतु चेहऱ्यावर रुग्णसेवा व समाजाप्रती आपले देणे पूर्ण केल्याचे असीम समाधान स्पष्ट दिसत होते, असेही राहुल मोहिते यांनी सांगितले.

अशा या महान व प्रेरणादायी कार्याला सलाम करतानाच नवीन पिढीने यांच्याकडून संयम, चिकाटी आणि सातत्य हे गुण शिकण्यासारखे आहेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सत्कार समारंभास राहुल मोहिते यांच्यासह नंदू मामा गावडे, विजय नंद वाघमोडे, सागर शिंदे, मोहसीन मेटकरी, अक्षय झोरे यांच्यासह फलटण तालुका सर्व केमिस्ट सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love