। लोकजागर वृत्त । फलटण । ३० ऑक्टोबर २०२६ ।
फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील गजानन चौक ते दगडी पूल या अत्यंत महत्त्वाच्या व रहदारीच्या रस्त्याचे रखडलेले काम अखेर मार्गी लागले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे आदेश, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांचे निर्देश आणि फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे प्रलंबित काम आता पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. या रस्त्याच्या कामाला यापूर्वी एप्रिल महिन्यात प्रशासकीय मंजुरी मिळाली होती, तर ऑगस्ट महिन्यात या कामाचे मोठ्या उत्साहात भूमिपूजनही संपन्न झाले होते. परंतु, जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबर आणि रस्त्यासाठी लागणाऱ्या इतर कच्च्या साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. साहित्याची तीव्र टंचाई आणि अचानक वाढलेल्या दरांमुळे या रस्त्याचे कामकाज काही काळ पूर्णपणे ठप्प झाले होते.
रस्त्याचे काम रखडल्यामुळे परिसरातील नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनচালकांची होणारी नाहक गैरसोय दूर करण्यासाठी नगरसेविका सिद्धाली शहा यांनी प्रशासनाकडे आणि वरिष्ठ नेत्यांकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिलेल्या सक्त आदेशामुळे आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व तांत्रिक व आर्थिक समस्येवर योग्य तोडगा काढण्यात आला, ज्यामुळे रस्त्याचे काम पुन्हा एकदा जोमाने सुरू करण्यात आले आहे.
यावेळी संवाद साधताना नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी आपला विकासाचा संकल्प बोलून दाखवताना सांगितले की, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ८ चा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्णपणे कटिबद्ध आहोत. रस्त्याचे रखडलेले काम पुन्हा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिक व वाहनचालकांनी तीव्र समाधान व्यक्त केले आहे.
