। लोकजागर वृत्त । फलटण । १६ नोव्हेंबर २०२६ ।
श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब यांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटण यांच्या वतीने तालुका स्तरीय भजन महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर आणि बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ असा दोन दिवस विविध भजनी मंडळांच्या सादरीकरणाने साजरा होणार आहे.
या भजन महोत्सवाची सुरुवात मंगळवारी सकाळी ९.३० वाजता मुधोजी मनमोहन राजवाडा, फलटण येथे प्रतिमा पूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.०० वाजता उद्घाटन समारंभ होईल. उद्घाटक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार मा. श्री. दीपकराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ व बुधवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत श्री ज्ञानेश्वर मंदिर, लक्ष्मीनगर, फलटण येथे विविध भजनी मंडळांचे सादरीकरण होणार आहे. तालुक्यातील अनेक नामांकित भजनी मंडळे यात सहभागी होणार असून भक्तीरसात न्हाऊन निघण्याची पर्वणी फलटणकरांना लाभणार आहे.
बुधवारी दुपारी ठीक ४.०० वाजता भजन महोत्सव समारोप होणार आहे. समारोपाच्या अध्यक्षस्थानी श्री नाईक निंबाळकर देवस्थान व इतर चॅरिटीज ट्रस्ट, फलटणचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व प्रमुख अतिथी म्हणून चैतन्य जप प्रकल्प (महाराष्ट्र) चे कार्याध्यक्ष ह.भ.प. धैर्यशीलभाऊ देशमुख हे मान्यवर राहणार आहेत उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सचिव प्राचार्य विश्वासराव देशमुख यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
भजनप्रेमींनी, भाविकांनी व फलटण तालुक्यातील नागरिकांनी या महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिरसाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
