आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील विकासकामे वेगाने पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

यंदा ५ हजार मोबाईल शौचालयांची व्यवस्था; पालखी तळांवर अतिरिक्त हँगर आणि पायाभूत सुविधांचे नियोजन.

। लोकजागर । मुंबई । २३ एप्रिल २०२६ ।

यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असून, त्यानिमित्त निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकरी भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पालखी तळांवर कायमस्वरूपी सुविधांवर भर: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पालखी तळांवर केवळ तात्पुरत्या नाही तर कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर पालखी तळांवर हँगरची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा वारकऱ्यांना मोठा फायदा झाला. त्यामुळे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांच्या गरजांनुसार अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी नमूद केले.

१३०३ कोटींचा विकास आराखडा आणि प्रगती: पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे पालखी मार्गावरील कामांची माहिती दिली. दोन्ही पालखी मार्गांतील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर झाले असून, आतापर्यंत ९५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या निधीतून पालखी तळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, भव्य कमानी, जमीन सपाटीकरण, हायमास्ट पोल, संरक्षक भिंती, रस्ते दुरुस्ती आणि पालखी कट्टे तयार करणे यांसारखी बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत.

स्वच्छता आणि महामार्गांचे नियोजन: वारकऱ्यांच्या सुविधेसाठी यंदा स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. गेल्या वर्षी ३७०० मोबाईल शौचालये उपलब्ध करून देण्यात आली होती, तर यंदा ही संख्या वाढवून ५ हजार मोबाईल शौचालये पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पालखी मार्गावरील महामार्गांची कामे जवळपास पूर्ण होत आली असून, सध्या दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर या मार्गांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रशासन यावर्षी वारी सोहळा अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी सज्ज झाले आहे.

Spread the love