। लोकजागर वृत्त । फलटण । २० जुलै २०२६ ।
फलटण पंचायत समितीच्या नव्या, भव्य आणि अद्ययावत इमारतीच्या उभारणीसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तब्बल २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या मंजुरीपैकी पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष बांधकामासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर शिवांजली भोसले यांनी सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. या पदग्रहण सोहळ्यादरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधून पंचायत समितीच्या जुन्या इमारतीची झालेली दुरावस्था आणि अपुरी जागा थेट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. तालुक्याचा वाढता विस्तार लक्षात घेता या वास्तूसाठी जादा निधी मिळण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. यानंतर शासन स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर या महत्त्वपूर्ण निधीला मंजुरी मिळवण्यात यश आले आहे.
सध्या अस्तित्वात असलेली फलटण पंचायत समितीची इमारत अतिशय जुनी आणि अपुरी पडत आहे. यामुळे कोणत्याही प्रशासकीय विभागाला पुरेशी जागा उपलब्ध नसून पंचायत समितीचे विविध विभाग शहरात इतरत्र विखुरलेल्या इमारतींमधून चालवले जात आहेत. परिणामी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना एका विभागातून दुसऱ्या विभागात फेऱ्या माराव्या लागत असून प्रशासकीय कामकाजातही अडथळे निर्माण होत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासकीय विभाग एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंजूर झालेली ही नूतन इमारत तब्बल ८ मजली असणार असून तिची रचना संपूर्ण राज्यासाठी एक पथदर्शक आदर्श ठरणार आहे. या इमारतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व प्रशासकीय विभागांना स्वतंत्र आणि सुसज्ज दालने दिली जातील, ज्यामुळे नागरिकांची सर्व कामे जलद गतीने एकाच ठिकाणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या इमारतीमध्ये पंचायत समितीच्या अखत्यारीत कार्य करणाऱ्या ग्रामसेवक संघटना, शिक्षक संघटना आणि कर्मचारी संघटनांसाठी स्वतंत्र कार्यालयांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच गावोगावी काम करणाऱ्या ग्रामसेवकांना पंचायत समितीमध्ये आल्यावर बसण्यासाठी आणि विश्रांतीसाठी स्वतंत्र व सुसज्ज कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. या आधुनिक इमारतीच्या उभारणीमुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडणार असून स्थानिक प्रशासनाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
