फलटण शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने स्पीडब्रेकर; प्रभाग ४ मधील धोकादायक वेगाला बसणार वेसण

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानंतर तात्काळ काम पूर्ण; नागरिकांकडून नगराध्यक्षांसह राहुल निंबाळकर यांचे आभार

। लोकजागर वृत्त । फलटण । २८ ऑगस्ट २०२६ ।

प्रभाग क्रमांक ४ मधील बॉम्बे डाईंग बोळ समोरील रस्ता तसेच रमेशचंद्र शेंडे यांच्या नरसोबा मंदिरास लागून ते समोर राजाभाऊ हिंगे यांच्या स्वयंभू महादेव मंदिरासमोरील रस्त्यावर फलटण नगरपालिकेकडून स्पीडब्रेकर टाकण्यात आले आहेत. या परिसरातील रहिवासी नागरिकांची अनेक वर्षांपासून ही रास्त मागणी होती. परिसरातील रोडरोमिओ तसेच नागरिकांनी आपल्या अल्पवयीन मुला-मुलींना मोकळीक दिल्याने ही मुले अत्यंत वेगाने दुचाकी चालवत असत, ज्यामुळे येथे भीषण अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. या समस्येचे गांभीर्य ओळखून प्रभागातील नागरिकांनी फलटण शहराचे अध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे रस्त्यावर स्पीडब्रेकर टाकण्याची मागणी केली होती.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तात्काळ प्रभाग क्रमांक ४ मधील राहुल निंबाळकर यांना बोलावून घेतले. नागरिकांना कोठे आणि कशा प्रकारे स्पीडब्रेकर हवे आहेत याची पाहणी करून ठेकेदाराला तत्परतेने काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. नगराध्यक्षांच्या आदेशानंतर तातडीने सूत्रे हलवत राहुल निंबाळकर यांनी विक्रम निंबाळकर, पोपटराव बर्गे, अरुण देशपांडे, प्रदीप शिंदे, भय्या पालकर, धीरज होरा, पवार, देशमुख व इतर नागरिकांना सोबत घेऊन संबंधित रहदारीच्या रस्त्यावर दोन ठिकाणी स्पीडब्रेकर बसवून घेतले.

अनेक दिवसांची समस्या तातडीने सुटल्याने प्रभाग क्रमांक ४ मधील वीर बाजीप्रभू मार्ग, बॉम्बे डाईंग बोळ, भैरोबा गल्ली परिसर आणि शुक्रवार पेठ मुख्य रस्त्यावरील रहिवासी नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे. परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व राहुल जगन्नाथ निंबाळकर यांचे जाहीर अभिनंदन करून आभार मानले आहेत.

Spread the love