सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण; वक्तृत्व, कविता व मनोगतातून कृतज्ञता व्यक्त.
। लोकजागर वृत्त । कोळकी । ५ सप्टेंबर २०२६ ।
फलटण येथील आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत मनोगते, कविता व भाषणे सादर केली. इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन केले.
सविता चोरमले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन केले. या वेळी मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप अभिजित चांगण यांनी मानलेल्या आभाराने झाला.
