बारामती खुनाचा प्रयत्न प्रकरण: आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन; ॲड. अक्षय महाडीक यांचा युक्तिवाद ठरला प्रभावी

। लोकजागर । बारामती । ७ मे २०२६ ।

बारामती तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर आरोपाखाली नोंद असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. अक्षय महाडीक यांनी केलेला कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरल्याने आरोपीचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला.

नोव्हेंबर २०२५ मध्ये या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीने ॲड. अक्षय महाडीक यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केल्यानंतर ॲड. अक्षय महाडीक यांनी अत्यंत प्रभावीपणे कायदेशीर बाजू मांडली. सदर घटना ही पूर्वनियोजित नसून अचानक उद्भवलेल्या वादातून घडलेली आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला असून आरोपीकडून आता कोणतीही जप्ती होणे शिल्लक नसल्याने त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्याची आवश्यकता नाही, असा मुद्देसूद युक्तिवाद ॲड. महाडीक यांनी केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन मा. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. प्रथमदर्शनी ही घटना पूर्वनियोजित नसल्याचे मत व्यक्त करत न्यायालयाने आरोपीस सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या महत्त्वपूर्ण प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय महाडीक आणि ॲड. ईशान पराडकर यांनी काम पाहिले. या निकालामुळे कायदेशीर वर्तुळात ॲड. अक्षय महाडीक यांच्या अभ्यासू युक्तिवादाचे कौतुक होत आहे.

Spread the love