१००० तुलसी पत्रे अर्पण; ध्रुव देशपांडे या बालगोपालाने फोडली दहीहंडी.
। लोकजागर वृत्त । फलटण । ७ सप्टेंबर २०२६ ।
दि. ५ सप्टेंबर रोजी श्रीराम मंदिर फलटण येथे मारुती स्तोत्र, रामरक्षा पठण, विष्णूसहस्त्रनाम व गीतेचा १५ वा अध्याय पठण या कार्यक्रमास स्त्रियांच्या लक्षणीय उपस्थितीने कार्यक्रम दैदीप्यमान व लक्षवेधक ठरला. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, फलटण आयोजित कार्यक्रमास पुरुष व स्त्रियांनी उत्तम प्रतिसाद दिला. यापूर्वीही २ शनिवारी आयोजित कार्यक्रम ही दणक्यात साजरे झाले होते. सायंकाळी ५ वाजता राम मंदिर येथे महिलांचे आगमन झाले त्यावेळी त्यांना हळदी-कूंकू लावून स्वागत करण्यात आले, तर मंगेश पेटकर यांनी सर्व पुरुषांचे गंध लावून स्वागत केले. या वेळी गोपाळ काल्यासाठी महिलांनी आपल्या सोबत आणलेल्या ल्हाया, चुरमुरे, दही, पोहे, फरसाण, खारातील मिरची, लोणचे, केळ, डाळिंब, सफरचंद, मीठ, लोणी यांचे मिश्रण २ मोठ्या पातेल्यात करण्यात आले. तसेच हॉटेल सेलीब्रेशन तर्फे सर्व भाविकांना चविष्ट व रुचकर शिरा प्रसादाचे वाटप करण्यात आले.
व्यासपीठावर श्रीरामप्रभू, हनुमान, गोपालकृष्ण यांच्या प्रतिमा फोटो, हार फुले यांनी सजविण्यात आल्या होत्या. शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक व शिक्षिकांचे स्वागत करून सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात आले. या वेळी बांधकाम व्यावसायिक आशिष व अल्पना गडकरी यांच्या हस्ते सर्व स्तोत्रांचे पठण होत असताना निरंजन क्षीरसागर यांच्या मंत्रघोषाने १००० तुलसी पत्रे गोपाल कृष्ण यांच्या मूर्तीवर भक्तीभावाने अर्पण करण्यात आल्या. ध्रुव देशपांडे या बालगोपालाच्या हस्ते दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. या वेळी ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर दाणी यांनी सर्वांचे स्वागत करून ब्राह्मण संघाच्या गीता पठण कार्यक्रमास स्त्रियांनी उपस्थिती दाखविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले, तसेच यापुढे या संस्थेमार्फत कार्यक्रम साजरे केले जातील त्याला असाच प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले.
व्यासपीठावर पुष्पाताई कदम, अनिता जोशी, वंदना जोशी, शिवानी चिटणीस इत्यादी ज्येष्ठ महिला सदस्यांनी मंत्र पठण केले. शेवटी उभयता गडकरी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आभार स्वानंद जोशी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यास मंडळाचे अध्यक्ष, कार्यकारिणी व महिला सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले.
