महाराणी सईबाई स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करावे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

। लोकजागर वृत्त । वेल्हे । ८ सप्टेंबर २०२६ ।

राजगडाच्या पायथ्याशी पाल खुर्द येथे असलेल्या महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळाच्या स्मारकाचे काम गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. हे काम प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून तत्कालीन उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांनी महाराणी सईबाई स्मारकासाठी सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. स्मारकाचा मूळ विकास आराखडा २९.७३ कोटी रुपयांचा होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुधारित अंदाजपत्रकानुसार एकूण आराखडा ४६ कोटी ३३ लाख ४५ हजार ८३ रुपये झाला आहे. स्मारकाच्या विकासामध्ये समाधीचा जीर्णोद्धार, परिसराचे सुशोभीकरण, संरक्षण भिंत, माहिती फलक तसेच भाविकांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांचा समावेश आहे.

फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याच्या राजकन्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची समाधी राजगडाच्या पायथ्याशी आहे. या ऐतिहासिक स्थळाशी महाराष्ट्राच्या जनतेच्या तीव्र भावना जोडलेल्या आहेत. महाराणी सईबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर गेले असता, त्यांनी या स्मारकाच्या अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत तीव्र भावना व्यक्त करत जनतेच्या तीव्र भावनाही मांडल्या.

महाराणी सईबाई या स्वराज्याच्या पहिल्या महाराणी आहेत आणि त्यांच्या स्मृतीस्थळाचे योग्य ते जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून, आता प्रशासनाने कामाला गती द्यावी. पुढील वर्षी अभिवादनासाठी येताना या ठिकाणी भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभे राहिलेले दिसावे, अशी अपेक्षा संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. या प्रसंगी फलटण संस्थानचे युवराज, शिवसेना नेते तथा फलटण नगर परिषदेचे नगरसेवक अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

Spread the love