टिपरी नृत्य आणि बालकृष्णाच्या वेशभूषेने वेधले लक्ष
। लोकजागर वृत्त । फलटण । ७ सप्टेंबर २०२६ ।
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा केला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाच्या चेअरमन अलका बेडकिहाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी इयत्ता पहिलीतील रिहान जाधव, समर्थ जाधव, शरण्या इंगळे, इयत्ता दुसरीतील उन्नती अहिवळे, शर्वरी जाधव, इयत्ता पाचवीतील विराज कुंभार, राक्षे आणि इयत्ता सहावीतील मोरे या चिमुकल्यांनी ‘बालकृष्ण’, ‘राधा’ आणि ‘गवळणीं’ची सुंदर वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मुलींनी गाण्यांच्या तालावर टिपरी नृत्य सादर करत उत्सवाचा आनंद लुटला, तर मुलांनीही ‘गोविंदा आला रे आला’ यासह विविध कृष्णभक्तीपर गाण्यांवर ठेका धरत नृत्याचा आनंद घेतला. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या वेळी चिमुकल्या गोविंदांनी मानवी थर लावत दहीहंडी फोडली. दहीहंडी फुटताच सर्व विद्यार्थ्यांनी पाण्याचा शिडकाव करत एकच जल्लोष केला. दहीहंडी फोडल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले. शालेय चिमुकल्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केलेला दहीहंडी उत्सव पाहून अलका बेडकिहाळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सादर केलेला हा उत्सव निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. विद्यार्थ्यांमध्ये एकता, सहकार्य आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी सांगितले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मनीष निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले, तर हेमलता गुंजवटे यांनी सूत्रसंचालन केले.
