माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून नव्या रोषणाईत नटले फलटण

अद्ययावत एलईडी पथदिव्यांचे दिमाखात लोकार्पण

। लोकजागर वृत्त । फलटण । १५ जुलै २०२६ ।

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागताचे औचित्य साधून माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष पुढाकारातून फलटण शहरात एक अत्यंत देखणा आणि महत्त्वाकांक्षी बदल पाहायला मिळत आहे. फलटण शहरातील अंतर्गत पालखी महामार्ग प्रकल्पांतर्गत राबवण्यात आलेल्या ‘वन टाईम इम्प्रूव्हमेंट’ योजनेमुळे आता संपूर्ण शहर रात्रीच्या वेळी आधुनिक लखलखाटाने नाहून निघाले आहे. या योजनेअंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासोबतच, नवीन आधुनिक पथदिव्यांचे (स्ट्रीट लाईट्स) विद्युतीकरण विशेष प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत पालखी मार्गावरील जुने, अंधुक आणि कालबाह्य झालेले सर्व दिवे बदलून त्याठिकाणी हाय-इफिशियन्सी म्हणजेच उच्च क्षमतेचे एलईडी (LED) पथदिवे बसवण्यात आले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे नगर परिषदेच्या विजेची मोठी आर्थिक बचत होणार असून, पालखी मार्गावर रात्रीच्या वेळी लख्ख प्रकाश राहणार आहे. महामार्गाचे स्वरूप आणि त्याचे झालेले रुंदीकरण लक्षात घेऊन रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांवर (डिव्हायडर्स) अत्यंत आकर्षक व मजबूत पथदिव्यांचे खांब उभारण्यात आल्यामुळे शहराच्या वैभवात आणि सौंदर्यात कमालीची भर पडली आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील अंतर्गत मुख्य रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकऱ्यांची व स्थानिक नागरिकांची होणारी मोठी गैरसोय थेट केंद्र सरकारच्या दरबारी मांडली होती. त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून (MoRTH) फलटण शहरांतर्गत पालखी मार्गाच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा विशेष केंद्रीय निधी मंजूर झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फलटणच्या विकासासाठी केवळ निधीच उपलब्ध करून दिला नाही, तर या कामाला गती दिली. याशिवाय स्थानिक पातळीवर ही सर्व कामे पालखी सोहळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी व विविध शासकीय विभागांमध्ये प्रशासकीय समन्वय राखण्यासाठी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह इतरही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषदेचे अधिकारी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.

पालखी सोहळ्याचे आगमन आणि चालू पावसाळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी या सर्व नवीन पथदिव्यांच्या कंट्रोल पॅनेलचे तांत्रिक परीक्षण (टेस्टिंग) प्रशासनाकडून आधीच यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले होते. या यशस्वी चाचणीनंतर काल या नयनरम्य पथदिव्यांचे अधिकृत लोकार्पण अत्यंत उत्साहात करण्यात आले असून, यामुळे रात्रीच्या वेळी शहराला अखंडित आणि सुरक्षित प्रकाश मिळणार आहे. या भव्य लोकार्पण सोहळ्यास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, शिवरूपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अमरसिंह नाईक निंबाळकर यांचेसह सर्व नगरसेवक, नगरसेविका व प्रमुख आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक, महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा, कामगार वसाहत ते गिरवी नाका आणि गिरवी नाका ते पिरॅमिड चौक या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य भागातील हे नवीन आधुनिक पथदिवे सध्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. या नवीन व अद्ययावत विद्युतीकरणामुळे फलटण शहरातील अंतर्गत वाहतूक रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षित व सुलभ झाली असून अपघातांचा धोकाही पूर्णपणे टळला आहे. फलटण शहरातील अंतर्गत पालखी महामार्गाचे हे भव्य काम आणि त्यासाठीचा कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करून आणण्यात प्रामुख्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत महत्त्वाचा राजकीय पुढाकार आणि सिंहाचा वाटा उचलला आहे. येत्या काळात शहरातील पालखी मार्गांतर्गत येणाऱ्या सर्व प्रमुख चौकांचे आकर्षक सुशोभीकरणही केले जाणार आहे. या आधुनिक आणि देखण्या विकासकामामुळे फलटणच्या नागरी पायाभूत सुविधांचा दर्जा थेट राष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून, संपूर्ण तालुक्यातून या प्रकल्पाचे आणि लोकप्रतिनिधींचे जाहीर कौतुक केले जात आहे.

Spread the love