फलटणला जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवार गट ठरणार ‘किंगमेकर’ : धर्मराज पाटील यांचा दावा

। लोकजागर । फलटण । दि. ०५ फेब्रुवारी २०२६ ।

फलटण तालुक्याच्या राजकीय पटलावर सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत पक्ष विलीनीकरण आणि तांत्रिक बदलांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात दिसत नसला तरी, ‘किंगमेकर’ म्हणून या पक्षाची भूमिका अत्यंत कळीची ठरणार आहे. तालुक्यात शरद पवारांच्या विचारांवर प्रेम करणारी आणि पक्षाशी एकनिष्ठ असणारी सुमारे २५ ते ३० हजार कट्टर मते असून, हा ‘अंडरग्राउंड करंट’ कोणाच्या पारड्यात पडणार, यावर विजयाचे समीकरण अवलंबून आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धर्मराज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पक्षाचे नेते धर्मराज पाटील यांनी अलीकडच्या काळात प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा वैयक्तिक दौरा करून कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे. पक्ष प्रत्यक्ष निवडणूक लढवत नसला तरी, या दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून ही मते नेमकी कोणत्या उमेदवाराला साथ देणार, याकडे सर्वच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. ऐन मतदानाच्या वेळी हा गट कोणाला कौल देतो आणि कोणाचे राजकीय गणित बिघडवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तालुक्यातील या सुप्त मतांचा ओघ ज्या बाजूला वळेल, त्याचे पारडे जड होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Spread the love