फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून विशेष आयोजन
। लोकजागर वृत्त । फलटण । ५ ऑगस्ट २०२६ ।
फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर सस्तेवाडी, फलटण येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (७५ वे वर्ष) महिला व विद्यार्थ्यांसाठी विशेष योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगगुरू रेखा भरत खिलारे (योगरेखा योग इन्स्टिट्यूट, फलटण) आणि योगशिक्षिका प्रणाली सोनिक गाडेकर, राधिका सतीश नाळे, दिपाली पिसाळ व पूजा शिंदे उपस्थित होत्या.
दैनंदिन जीवनात योगासनाचे महत्त्व विशद करताना वक्त्यांनी सांगितले की, मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी रोज योग करणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांचा आणि महिलांचा आहार कसा असावा, त्यातून योग्य पोषणमूल्ये कशी मिळतात आणि जंक फूड टाळणे का आवश्यक आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उत्तम आरोग्यासाठी केवळ आहार आणि व्यायाम पुरेसा नसून निरोगी शरीरासाठी वेळेवर आणि पुरेशी झोप घेणे किती महत्त्वाचे आहे, हे उदाहरणांसह पटवून देण्यात आले.
स्त्री ही कुटुंबाचा कणा असते, घराची आणि घरातील सर्व सदस्यांची देखभाल करताना बहुतांश महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात; मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच महिलांनी स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे, योग्य आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू रेखा भरत खिलारे यांनी केले. घरातील सर्वांना वाढल्यानंतर उरलेले अन्न खाण्याची किंवा स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करण्याची सवय महिलांनी सोडली पाहिजे. महिलांनी आपल्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे, हिरव्या पालेभाज्या, फळे व पुरेसे पाणी यांचा समावेश करावा, स्वतःचा आहार वेळेवर घेणे हेच निरोगी आरोग्याची पहिली पायरी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या दैनंदिन जीवनातील बसण्याच्या व उठण्याच्या पद्धतींचाही आपल्या शरीरावर खोल परिणाम होत असतो. जेवल्यानंतर किंवा काम करताना पुढे झुकून किंवा पोक काढून बसल्यामुळे पोटातील अवयव दबले जातात, यामुळे अन्न पचनाची गती मंदावून एसिडिटी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठासारख्या समस्या निर्माण होतात, असे मार्गदर्शन योगशिक्षिकांनी केले. खांदे पाडून आणि वाकून बसल्याने छातीची पोकळी आकुंचन पावते, ज्यामुळे फुफ्फुसांना पूर्णपणे विस्तारण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही, परिणामी ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन थकवा येणे, जलद श्वास घ्यावा लागणे आणि कामातील एकाग्रता कमी होणे यांसारखे त्रास होतात, असेही त्यांनी पटवून दिले.
सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या योग सेशनला महिला पालकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांनी विविध योगासनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून पाहिले. यासाठी राधिका, प्रणाली, दिपाली व पूजा यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे नेटके आयोजन व नियोजन श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर, सस्तेवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. हा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक रुपेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन अनिता बागल यांनी केले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी माहिती तेजस्विनी शिंदे यांनी सांगितली, तर आभाराचे काम शर्मिला माने यांनी केले.
