फलटणच्या वैभवात मानाचा तुरा! ‘दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर’ची ऐतिहासिक सुरुवात; उद्या रंगणार उद्घाटन सोहळा

। लोकजागर । फलटण । दि. १४ फेब्रुवारी २०२६ ।

फलटण शहराच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन इतिहासात उद्या एक ऐतिहासिक सुवर्णपान जोडले जाणार आहे. फलटणकरांच्या गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला यश आले असून, बहुप्रतिक्षित ‘दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर’ (Civil Court Senior Division) उद्यापासून प्रत्यक्ष सेवेत येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण–कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील यांच्या अथक परिश्रमातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे न्यायालय मंजूर झाले असून, या निर्णयाने फलटणच्या न्यायव्यवस्थेला नवी झळाळी मिळणार आहे.

दिग्गज न्यायमूर्तींच्या उपस्थितीत सोहळा

येत्या रविवारी, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता विमानतळाशेजारील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीत हा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन आर. बोरकर यांच्या शुभहस्ते या न्यायालयाचे उद्घाटन होईल. याप्रसंगी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे, राजेश एस. पाटील, संजय ए. देशमुख आणि रणजितसिंह राजा भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद शं. वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सातारावारीतून मिळणार कायमची मुक्ती

वरिष्ठ स्तरावरील दिवाणी दाव्यांच्या सुनावणीसाठी आजवर फलटण आणि खटाव-माण तालुक्यातील पक्षकारांना वारंवार सातारा येथे जावे लागत होते. यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैशाचा मोठा अपव्यय होत असे. आता हे न्यायालय स्थानिक पातळीवर सुरू होत असल्याने हजारो पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार असून, वकिलांचीही मोठी सोय होणार आहे. फलटण बार असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत करत हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.

जिल्हा निर्मितीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा

नुकतेच राज्य मंत्रिमंडळाने फलटणला ‘अप्पर जिल्हाधिकारी’ कार्यालय मंजूर केले असून, त्यानंतर लगेचच वरिष्ठ स्तर न्यायालयाची प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. एका पाठोपाठ एक मिळणाऱ्या या प्रशासकीय आणि न्यायालयीन मंजुऱ्यांमुळे ‘फलटण जिल्हा’ निर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणला जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी जो पाया रचला आहे, त्यातील हे वरिष्ठ स्तर न्यायालय अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण फलटण शहर सजले असून, न्यायालय परिसरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love