भरकटलेली तरुणाई शिवविचारानेच तरणार : प्रा. रवींद्र कोकरे

सस्तेवाडी येथे पारंपारिक पद्धतीने शिवजयंती सोहळा संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. २१ फेब्रुवारी २०२६ ।

“कपाळावर चंद्रकोर, डोक्यावर फेटा आणि हातात भगवा ध्वज घेऊन केवळ डीजेच्या दणदणाटात नाचणे म्हणजे शिवजयंती नव्हे. शिवजयंतीच्या नावाखाली होणारा बिभत्स नाच, व्यसनाधीनता आणि बुलेटचा कर्कश आवाज यापेक्षा छत्रपतींच्या नजरेतून आपल्या परिसराकडे पाहण्याची गरज आहे. ज्या राजांनी रक्ताचे पाणी करून हे स्वराज्य जिंकले, त्याच मातीत आज प्लास्टिक, कचरा, अस्वच्छता, गुंडागिरी आणि भ्रष्टाचार वाढत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भरकटलेल्या तरुणाईला केवळ शिवविचारच तारू शकतात,” असे परखड मत ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी मांडले.

सस्तेवाडी (ता. फलटण) येथे सार्वजनिक ३९६ व्या शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘शिवरायांचे मावळे अन् आजची तरुणाई’ या प्रबोधनात्मक व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आजच्या तरुणाईच्या बदलत्या जीवनशैलीवर आणि उत्सवाच्या स्वरूपावर सडतोड भूमिका मांडली. प्रा. कोकरे पुढे म्हणाले की, “तरुणाईने गावभर हुंदडण्यापेक्षा समाजातील जातीयता आणि राजकारण या गोष्टींना फाटा द्यावा. वृक्षारोपण, वक्तृत्व, निबंध, चित्रकला आणि मैदानी खेळांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करून नवा आदर्श निर्माण करावा. तसेच प्रसारमाध्यमांचा संयमित वापर करून गडकोट संवर्धनाची मोहीम हाती घ्यावी.”

या सोहळ्याचे नियोजन अतिशय पारंपारिक आणि आदर्श पद्धतीने करण्यात आले होते. शिवविचार मंचावर समितीचे अध्यक्ष अमर सस्ते, आत्माराम सस्ते आणि हनुमंत कोकरे उपस्थित होते. सिंहगडावरून आणलेली शिवज्योत, पारंपारिक वाद्यांचा गजर, मराठमोळी वेशभूषा, भव्य शोभायात्रा आणि शिवगर्जना-आरतीने सस्तेवाडीचा परिसर शिवभक्तीने न्हाऊन निघाला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर सस्ते, प्रतिक चव्हाण, किरण सस्ते, आदेश शिंदे, शशिकांत पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला परिसरातील शिवभक्त, महिला आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Spread the love