। लोकजागर । फलटण/पुणे । दि. ११ मार्च २०२६ ।
बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर एम्पलॉइज वेल्फेअर ऑर्गनायझेशन, पुणे यांच्या वतीने आज मंगळवार, दि. १० मार्च रोजी पुणे येथील ‘निवारा’ येथे सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये फलटण येथील सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पाने वर्षभरात राबवलेल्या उल्लेखनीय सामाजिक, सांस्कृतिक आणि विशेषतः शैक्षणिक उपक्रमांची दखल घेऊन त्यांना २५ हजार रुपयांचा मदत निधी प्रदान करण्यात आला.
बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी अभियंता श्री. निधु सक्सेना आणि ऑर्गनायझेशनच्या सचिव सौ. भारती ठाकूर यांच्या हस्ते या निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला. सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पाच्या वतीने प्रकल्पप्रमुख श्री. पोपटराव बर्गे आणि शिक्षक श्री. योगेश ढेकळे यांनी हा निधी स्वीकारला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी आणि दुर्गम भागात प्रयोगशाळा पोहोचवण्यासाठी हा निधी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
समाजाप्रती उत्तरदायित्व जपण्याच्या उद्देशाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी सुरू ठेवलेला हा कृतज्ञता सोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळेने सातत्याने विज्ञानाचा प्रसार केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी यावेळी त्यांचे कौतुक केले. या निधीमुळे प्रयोगशाळेच्या भविष्यातील शैक्षणिक मोहिमांना बळ मिळणार असून, फलटणमधील शिक्षण क्षेत्रातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
