माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
। लोकजागर । फलटण । शनिवार, दि. १४ मार्च २०२६ ।
सातारा जिल्हा परिषद आणि फलटण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने फलटणकरांच्या उत्तम आरोग्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील सोमवार पेठ आणि मलठण या दोन महत्त्वाच्या भागांत नव्याने उभारण्यात आलेल्या ‘नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रां’चा भव्य उद्घाटन सोहळा आज, शनिवार १४ मार्च रोजी संपन्न होत आहे. या केंद्रामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आता त्यांच्या घराच्या जवळच अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दिग्गजांची उपस्थिती आणि वेळ: या दोन्ही केंद्रांचे उद्घाटन माढा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
- सोमवार पेठ: फिरंगाई मंदिराजवळ असलेल्या केंद्राचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता होईल.
- मलठण: प्रेमिलाताई हायस्कूलच्या पाठीमागे, नगरपालिका शाळा नं. ६ शेजारील केंद्राचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता होईल.
प्रमुख अतिथींची मांदियाळी: या सोहळ्याला उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, ॲड. नरसिंह निकम, दिलीपसिंह भोसले, मिलिंद नेवसे, मुख्याधिकारी निखिल जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लिला मदने यांच्यासह सर्व सभापती आणि नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
आरोग्य व्यवस्था होणार लोकाभिमुख: शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, प्राथमिक आरोग्य सोयी वेळेत मिळाव्यात यासाठी ही केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले आहे. फलटणमधील सार्वजनिक आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी उचललेल्या या पावलाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
आयोजकांच्या वतीने या दोन्ही उद्घाटन सोहळ्यांना फलटणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
