उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने राबवण्यात आला विशेष उपक्रम; चालकांना अधिकृत ओळख मिळाल्याने प्रवाशांचा विश्वास वाढण्यास होणार मदत.
। लोकजागर । फलटण । २६ मार्च २०२६ ।
फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’च्या सदस्यांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक रेणुका राठोड आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तेजस्विनी कांबळे यांच्या हस्ते हे वितरण पार पडले. या उपक्रमामुळे फलटण शहर आणि परिसरातील रिक्षा तसेच टॅक्सी चालकांना आता शासनाकडून अधिकृत ओळख मिळाली असून, त्यांच्या सुरक्षेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश चालकांना अधिकृत ओळख मिळवून देणे, त्यांच्या सामाजिक सुरक्षेचे प्रश्न मार्गी लावणे आणि प्रवाशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हा आहे. ओळखपत्र वितरणादरम्यान उपस्थित परिवहन अधिकाऱ्यांनी चालकांना रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चालकांना ओळखपत्रांसोबतच गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे रिक्षा चालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाच्या अशा कल्याणकारी योजना भविष्यातही सातत्याने राबविण्याची अपेक्षा चालकांनी व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमास कनिष्ठ लिपिक उमाकांत दीक्षित, करणसिंह लेंबे, सागर लाळगे यांच्यासह ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटने’चे अध्यक्ष दिनेश अहिवळे, सातारा जिल्हा वाहक संघाचे सरचिटणीस विठ्ठल पोळ आणि जिल्हाध्यक्ष सिद्धनाथ भुजबळ उपस्थित होते. तसेच फलटण शहरातील विविध रिक्षा संघटनांचे सदस्य, चालक आणि मालक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. परिवहन विभागाच्या या पुढाकारामुळे रिक्षा व्यवसायाला अधिक व्यावसायिक स्वरूप प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
