बेकायदेशीर नळ कनेक्शन २७ एप्रिलपर्यंत नियमित करा, अन्यथा होणार कायमचे बंद; फलटण नगरपरिषदेचा कडक इशारा

अनधिकृत नळधारकांवर दंडात्मक कारवाईचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे निर्देश; सार्वजनिक नळही होणार बंद.

। लोकजागर । फलटण । २२ एप्रिल २०२६ ।

फलटण नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत नळ कनेक्शनबाबत प्रशासनाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. ज्या नागरिकांनी बेकायदेशीररीत्या नळ कनेक्शन घेतले आहेत, त्यांनी येत्या २७ एप्रिलपर्यंत स्वतःहून ही कनेक्शन नियमित करून घ्यावीत, अन्यथा संबंधित कनेक्शन कायमचे बंद करून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे.

नगरपरिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, २७ एप्रिल २०२६ पर्यंत जर नागरिकांनी स्वतःहून नळ कनेक्शनची नोंदणी नगरपालिकेत केली, तर त्यांच्याकडून कोणताही दंड न आकारता ते कनेक्शन नियमित करून दिले जाणार आहे. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही जे नागरिक आपले अनधिकृत कनेक्शन नियमित करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांचे पाणी कनेक्शन केवळ कापले जाणार नाही, तर नियमानुसार मोठा दंडही आकारला जाणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील सर्व सार्वजनिक नळ कनेक्शन देखील कायमचे बंद करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. सार्वजनिक नळांवर अवलंबून असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दोन ते पाच नागरिकांच्या गटासाठी ‘ग्रुप नळ कनेक्शन’ देण्याची योजना राबवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होणार आहे.

फलटण शहरातील प्रत्येक नागरिकाला वेळेत आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगरपालिका विविध स्तरावर उपाययोजना राबवत आहे. अनधिकृत नळ कनेक्शनमुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनात अडथळे निर्माण होत असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण शहराला नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नमूद केले.

Spread the love