फलटणमध्ये श्रीराम नवमीनिमित्त आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन

राजवाडा चौकातील श्रीराम मंदिरातून निघणार शोभायात्रा; सायंकाळी ६ वाजता होणार प्रारंभ.

। लोकजागर । फलटण । २६ मार्च २०२६ ।

श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर फलटण शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि हिंदू संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही शोभायात्रा फलटणकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

ही भव्य मिरवणूक सायंकाळी ६ वाजता फलटणमधील ऐतिहासिक राजवाडा चौकातील श्रीराम मंदिर येथून निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, रामभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पारंपरिक वाद्ये, भगवे ध्वज आणि प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने फलटण नगरी दुमदुमून जाणार आहे.

फलटणमधील सर्व आबालवृद्धांनी या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love