माजी विस्तार अधिकाऱ्यांकडे संघटनेची धुरा; सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची नूतन अध्यक्षांची ग्वाही.
। लोकजागर । फलटण । २९ मार्च २०२६ ।
फलटण तालुका सेवानिवृत्त संघटनेच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदी माजी विस्तार अधिकारी लालासाहेब हरिभाऊ निंबाळकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संघटनेचे माजी अध्यक्ष सदाशिव यशवंत खरात यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. या निवडीसाठी संघटनेची विशेष बैठक नुकतीच सुभाष देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत लालासाहेब निंबाळकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला, ज्याला सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष निंबाळकर म्हणाले की, “सेवानिवृत्त सदस्यांच्या पेन्शनविषयक व इतर कार्यालयीन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी सतत प्रयत्नशील राहील. सदस्यांच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य लाभेल.”
सभेच्या सुरुवातीला सचिव रामभाऊ कदम यांनी सभेचे इतिवृत्त वाचून संघटनेच्या मागील कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य नाना खानविलकर, स. रा. मोहिते, सूर्यकांत इनामदार, रमेश कुचेकर, भिवरकर यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लालासाहेब निंबाळकर यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
