दांभिकतेच्या उन्मादावर फलटणच्या साहित्यिकांचा कडक प्रहार; ३७ व्या ‘साहित्यिक संवाद’मध्ये उमटले अस्वस्थ लेखणीचे पडसाद

भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मानसिकतेवर जेष्ठ विचारवंतांचे ताशेरे; समाजाच्या ढासळत्या स्वास्थ्याबद्दल साहित्यिक वर्तुळात व्यक्त झाली मोठी चिंता.

। लोकजागर । फलटण । ०२ एप्रिल २०२६ ।

समाजात सध्या फोफावत चाललेली भोंदूगिरी, अंधश्रद्धेचा बाजार आणि त्यातून निर्माण झालेला दांभिकतेचा उन्माद या विषयावर फलटण येथे आयोजित ३७ व्या ‘साहित्यिक संवाद’मध्ये उपस्थित लेखकांनी आणि विचारवंतांनी आपल्या लेखणीतून कडक शब्दांत प्रहार केला. कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावरील पुजाऱ्यांनी भक्ताला दिलेली वागणूक आणि राजकीय नेत्यांकडून भोंदूबाबांचे पाय धुतले जाणे, यांसारख्या घटनांवर ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी मांडलेल्या ‘दांभिकतेचा उन्माद’ या लेखाच्या पार्श्वभूमीवर हे विशेष विचारमंथन पार पडले.

यावेळी बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते व ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुधीर इंगळे यांनी समाजात भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्या सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांवर ओढले. आपल्या आजूबाजूला अशा प्रवृत्तींचा उन्माद वाढत असून, त्याला रोखण्यासाठी समाजाने आपली दांभिक मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी लेखकांच्या मनातील अस्वस्थता व्यक्त करताना सांगितले की, जग युद्धाने अशांत असताना आपण मात्र बुवाबाजीच्या विळख्यात अडकत आहोत. साहित्यिकांनी आपल्या परखड लेखणीतून हे वास्तव मांडले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रा. श्रेयस कांबळे यांनी सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी दांभिक उन्माद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, साहित्यिकांनी आपल्या लेखणीने अशा प्रवृत्तींना वेळोवेळी फटकारले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आप्पा तांबे यांनी ग्रामीण भागातील बुवाबाजीवर आधारित ‘तरडगावचा आप्पा’ या कथेचे प्रभावी कथाकथन सादर करून उपस्थितांचे डोळे उघडले. या संवादाच्या माध्यमातून फलटणच्या साहित्यिक क्षेत्रातून समाजातील दांभिकतेवर एक प्रकारे रणशिंगच फुंकले गेले आहे.

Spread the love