स्त्रीशक्ती आणि सामाजिक समतेचा नवा अध्याय; महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त महिलांच्या नेतृत्वाखाली विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन.
। लोकजागर । फलटण । ०३ एप्रिल २०२६ ।
फलटण तालुक्यातील राजाळे येथील भीमनगरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एक क्रांतिकारी आणि प्रेरणादायी निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या सार्वजनिक जयंती महोत्सवाचे संपूर्ण नियोजन आणि नेतृत्वाची धुरा येथील महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ आणि ‘समता दिना’चे औचित्य साधून घेतलेला हा निर्णय स्त्रीशक्ती आणि सामाजिक परिवर्तनाचा एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या समान हक्कांच्या प्रेरणेतून “चूल आणि मूल” या चौकटीबाहेर पडत महिलांनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कंबर कसली आहे.
या महोत्सवाच्या नियोजनासाठी बायनाबाई भिमराव भालेराव, कल्पना महावीर भालेराव, शीतल गौतम भोसले, स्वाती संजय कांबळे, दीपाली शरद कांबळे आणि मानसी अजय भालेराव या सहा महिलांची मुख्य समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार अशी महत्त्वाची पदे महिलांकडेच सोपवण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लागार, सजावट, उपहार आणि मनोरंजन अशा विविध समित्यांची रचना करून अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. गाव आणि तालुका स्तरावर अशा प्रकारे महिलांच्या पूर्ण नेतृत्वाखाली जयंती साजरी होणे, ही एक दुर्मिळ आणि अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा अतिशय वैविध्यपूर्ण असून, यामध्ये केवळ मनोरंजनावर भर न देता प्रबोधनाला प्राधान्य दिले आहे. ६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवले जाणार असून, ७ ते १३ एप्रिल दरम्यान ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन केले जाईल. याशिवाय सामाजिक समता मेळावा, महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपट, भीम गीतांचे कार्यक्रम, जेष्ठ महिलांचा सत्कार आणि ‘होम मिनिस्टर’सारखे कार्यक्रम आयोजित केले आहेत. १३ एप्रिल रोजी डान्स व नाटक स्पर्धा होतील, तर १४ एप्रिल रोजी मुख्य जयंती दिनी पुस्तके व झाडांचे वाटप, भव्य मिरवणूक आणि महाड सत्याग्रहाचे जिवंत देखावे सादर केले जाणार आहेत. राजाळे भीमनगरचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरणार असून, ‘भीमाच्या लेकी’नी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
