पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची अधिसूचना; २५ मे पर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन.
। लोकजागर । दहिवडी । ३० एप्रिल २०२६ ।
दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिवडी ते गोंदवले बुद्रुक दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करावयाचे असल्याने, या कामाच्या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकारानुसार याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
अशी असेल नवी वाहतूक व्यवस्था (दि. ०२ मे ते २५ मे २०२६):
येत्या २ मे २०२६ रोजी मध्यरात्री (००:०१ वा.) पासून ते २५ मे २०२६ रोजी रात्री २३:५९ वाजेपर्यंत दहिवडी ते गोंदवले या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. या काळात वाहन चालकांनी खालील पर्यायी मार्गांचा अवलंब करावा:
- दहिवडीकडून गोंदवकडे जाताना: दहिवडी बाजूकडून गोंदवले बुद्रुककडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक मायणी चौक दहिवडी येथून खांडसरी चौक मार्गे गोंदवले बुद्रुक अशी वळवण्यात आली आहे.
- म्हसवड/गोंदवकडून दहिवडीकडे येताना: म्हसवड व गोंदवले बुद्रुक बाजूकडून दहिवडीकडे जाणारी वाहतूक गोंदवले बुद्रुक येथील आप्पा महाराज चौकातून पंढरपूर ते सातारा मार्गाने खांडसरी चौक मार्गे दहिवडीकडे जाईल.
प्रशासनाचे आवाहन: वाहतूक वळवण्यात आलेल्या मुख्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुलाचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत हे बदल लागू राहतील. तरी सर्व नागरिक आणि वाहन चालकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रशासनास व पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ही अधिसूचना आज ३० एप्रिल २०२६ रोजी अधिकृतपणे जारी करण्यात आली.
