प्रशासनाकडून ९६ प्रगणक गटांची निर्मिती; ३३ प्रश्नांच्या माध्यमातून संकलित होणार माहिती.
। लोकजागर । फलटण । ३० एप्रिल २०२६ ।
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फलटण नगरपरिषद हद्दीत १६ व्या जनगणनेच्या कामाला लवकरच सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे यंदाची जनगणना प्रशासनामार्फत प्रथमच पूर्णपणे “डिजिटल” स्वरूपात मोबाईल ॲपच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दोन टप्प्यात होणार प्रक्रिया: ही जनगणना प्रामुख्याने दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घर यादी आणि घर गणनेचे काम केले जाईल. त्यापूर्वी, १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना census.gov.in या संकेतस्थळावर “स्व-गणनेचा” (Self-enumeration) पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याद्वारे नागरिक स्वतःच्या घराची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि मालमत्तेची माहिती ऑनलाईन भरू शकतील. त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील.
असे आहे नियोजित मनुष्यबळ: शहरातील १३ प्रभागांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण ९६ प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात साधारणपणे १८० ते २०० घरे आणि ७०० ते ८०० लोकसंख्येचा समावेश आहे. या कामासाठी ९२ प्रगणक आणि १८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, या सर्व कर्मचाऱ्यांना ५ ते ७ मे २०२६ दरम्यान विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या बाबी:
- या प्रक्रियेत प्रगणकांमार्फत प्रत्येक कुटुंबाला एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत.
- जनगणनेनंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक प्राप्त होईल, जो भविष्यातील कामांसाठी नागरिकांनी जपून ठेवणे आवश्यक आहे.
जनगणनेतून गोळा होणारी सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती भविष्यातील विकास योजनांसाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखील जाधव यांनी केले आहे.
