नगरसेविका सिद्धाली शहा यांचा उपक्रम; ९ आणि १६ मे रोजी नागरिकांना पुन्हा संधी
। लोकजागर । फलटण । ३ मे २०२६ ।
माऊली फाउंडेशन आणि पोस्ट ऑफिस फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आधार कार्ड कॅम्प यशस्वीरित्या संपन्न झाला. या शिबिराला फलटणकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
मोफत आधार नोंदणी आणि दुरुस्ती: या शिबिराबाबत अधिक माहिती देताना कु. सिद्धाली शहा यांनी सांगितले की, सहा महिन्यांच्या बालकांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींचे मोफत आधार कार्ड याठिकाणी काढून देण्यात आले. यासोबतच ज्या नागरिकांच्या आधार कार्डमध्ये काही त्रुटी होत्या, अशा दुरुस्तीची कामेही या शिबिराच्या माध्यमातून करून देण्यात आली.
पुन्हा दोन शनिवारी शिबिराचे आयोजन: नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेता, कु. सिद्धाली शहा यांनी हे शिबीर पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवार, दिनांक ९ मे २०२६ आणि शनिवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजलेपासून नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या कार्यालयात हे शिबीर पुन्हा संपन्न होणार आहे.
सहभागाचे आवाहन: ज्या नागरिकांना आधार कार्ड काढणे किंवा त्यात बदल करणे अद्याप शक्य झाले नाही, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. नागरिकांनी आपल्या आधार कार्डचे अद्ययावतीकरण आणि नूतन आधार कार्ड काढून घेण्यासाठी या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन कु. सिद्धाली शहा यांनी केले आहे.
